Jump to ratings and reviews
Rate this book

वाटेवरल्या सावल्या

Rate this book
या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी स्वत:च्या मातु.श्री, मा. विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि.स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. त्या-त्या परिस्थितीतील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना तर त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करुन करुण-व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर उभी राहतात.
गदिमा हे मराठी साहित्य-संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. ऋतुपरत्वे अनेक उन्हाळे, पावसाळे, वादळे या झाडाने पाहिली आणि साहिली. तरीही हे स्वाभिमानी व कष्टाळू झाड ताठ उê

138 pages, Kindle Edition

Published September 8, 2019

82 people are currently reading
70 people want to read

About the author

Gajanan Digambar Madgulkar

25 books22 followers
Gajānan Digambar Mādgulkar was a Marāthi poet, lyricist, writer and actor from India. He is popularly known in his home state of Maharashtra by just his initials as Ga Di Ma (गदिमा). He was awarded Sangeet Natak Akademi Award in 1951 and Padma Shri in 1969.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
161 (60%)
4 stars
78 (29%)
3 stars
21 (7%)
2 stars
1 (<1%)
1 star
6 (2%)
Displaying 1 - 14 of 14 reviews
Profile Image for Devi Keluskar.
50 reviews4 followers
September 16, 2022
आज पर्यंत ग.दि.मा. ना फक्त एक नामांकित कवी म्हणून मी ओळखत आले. पण कवी होण्याआधी बालपणा पासून ते कोणत्या हालअपेष्टेतुन गेले, त्या नंतर मराठी चित्रपट सृष्टीत ते कसे आले आणि नंतर प्रसिध्द कवी म्हणून कसे ओळखले जाऊ लागले ह्याचे सुंदर वर्णन पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे एक साधे सोप्पे सुटसुटीत प्रत्येकाने वाचावे असेच आत्मचरित्र आहे.

Amazon Prime वर हे पुस्तक free आहे.
Profile Image for Vikram Choudhari.
53 reviews12 followers
July 11, 2023
● पुस्तक - वाटेवरल्या सावल्या
● लेखक – गजानन दिगंबर माडगूळकर
● साहित्यप्रकार - आत्मचरित्र
● पृष्ठसंख्या – १६३
● प्रकाशक – साकेत प्रकाशन
● आवृत्ती - प्रथम आवृत्ती - डिसेंबर १९८१
● पुस्तक परिचय - विक्रम चौधरी


“स्वये श्री राम प्रभू ऐकती.. 
कुश लव रामायण गाती..” 

या ओळी कानांवर पडल्या की आपण मराठी असल्याचा अभिमान वाटल्याखेरीज राहत नाही.. मराठी काव्य, संगीताची तळी अनेक प्रतिभावंत सारस्वत पुत्रांनी एकत्र उचलली, तिला एक उंची मिळवून दिली.. मराठी काव्याच्या या वाटचालीत बहुमोल योगदान दिले ते आधुनिक वाल्मिकी म्हणून त्रिलोकी मान्यता पावलेले; माडगूळच्या भूमीतील एक रसाळ बीज म्हणजे गजानन दिगंबर कुलकर्णी यांनी..

अगदी रसाळ, विविध भावनांनी आणि जाणिवांनी ओतप्रोत असे नानाविध साहित्यप्रकार लिहीणाऱ्या गदिमांना त्यांच्या वैशाखी वणव्यासारख्या जीवनात लाभलेल्या विसाव्याच्या आणि सावल्यांचा आलेख म्हणजे “वाटेवरल्या सावल्या” हे आत्मचरित्र..

हे पुस्तक म्हणजे एक दिवाळी अंकात लिहिलेला बालपणाबद्दलचा प्रदीर्घ लेख आणि एका मासिकातली लेखमाला यांचं संकलन. गदिमांच्या जन्मापासून ते त्यांचा आयुष्यातील संघर्ष थोडा कमी होऊन त्यांचा 'वंदे मातरम्' चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत झालेला प्रवास गदिमांनी या आत्मचरित्रात वर्णन केलेला आहे. विशेष म्हणजे गदिमांचे हे अपूर्ण आत्मचरित्र जेथे संपते तेथूनच गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांचे आत्मचरित्र “आकाशाशी जडले नाते” सुरु होते व गदिमांना मिळालेले चित्रपटसृष्टीतील व साहित्यातील गदिमांच्या मृत्यूपर्यंत सहजीवनाची कथा पूर्ण करते. 

जीवनाच्या प्रत्येक वळणावर फक्त आणि फक्त संघर्ष लिहलेला असतानाही मनात कुठलाच कटूपणा येऊ न देता प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रांजळपणे चुका मान्य करण्याची गदिमांची प्रवृत्ती प्रत्येक पानात अनुभवता येते. 

कलेच्या ध्यासाने गदिमा निरंतर वाटचाल करत राहिले. “रोज पावसात भिजत, ये जा करताना बाबूरावांनी अचानकपणे देऊ केलेली छत्री” गदिमांना त्यांच्यावर असलेल्या कृपाछत्राची खूण वाटली. या आत्मचरित्रात गदिमांनी, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके, भालजी पेंढारकर अश्या अनेकांनी त्यांना नेहमी दिलेल्या आधाराच्या हाताचे वर्णन कृतज्ञताभावाने तसेच तितक्याच उत्कटतेने केले आहे..  प्रत्येक प्रसंगानुरूप स्वतःच्या मनःस्थितीचे अचूक वर्णन करताना गदिमा वाचकांच्या मनाला नकळत हात घालतात आणि मनावर विलक्षण प्रभाव पाडतात..

आयुष्यात थोडे स्थैर्य आल्यानंतर आपण समाजाचे देणे लागतो ही जाणीव गदिमांना सतत असायची. त्याबद्दल गदिमा लिहितात, 

“मी पोचलो आहे त्या जागी हात-पाय पसरून बसावे, इतकी जागा आहे. हात उशाशी घेऊन थोडी झोप काढावी, इतका अवसर आहे. भूक, तहान सहज भागावी इतकी सुविधा आहे. कुणी मागितलाच तर घासातला घास काढून देता यावा एवढेच का होईना, पण वैपुल्य आहे. किती चालून आलो आणि कसे चालून आलो याचा विचार करावा इतकी उसंत मिळणेही शक्य आहे. चालत आलेला मार्ग माझ्याही स्मरणात पूर्णपणे नाही. क्षण आणि कण संग्रही ठेवून माणूस करणार काय? ते प्रचंड ओझे पेलण्याइतकी शक्तीही त्याच्या स्मरणेंद्रियात असेल तरी कुठली?”

मी पोहोचलो आहे ते स्थान कोण्या दुर्लभ जागी आहे असे मुळीच नाही. माझ्यापुरते मला या एवढ्याश्या यश:प्राप्तीचे नवल आहे, इतकेच..!!

गदिमा हे मराठी साहित्यसृष्टीला आणि चित्रसृष्टीला पडलेले एक अभिजात स्वप्न या स्वप्नाने मराठी माणसांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा चढवला. ‛गदिमा’ हा मराठी संस्कृतीने जपलेला एक मोठा संस्कार ठरला. घराघरामध्ये, मनामनामध्ये आणि ओठाओठावर हा संस्कार मोठ्या श्रद्धेने जपला गेला. 

१९७७ साली गदिमांच्या झालेल्या अकाली निधनामुळे हे आत्मचरित्र अपूर्ण राहिले. त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून त्यांचे उर्वरित आयुष्य उलगडले नाही ही खंत वाचक म्हणून मनाला बोचत रहाते.

तरीही हे आत्मचरित्र एका कलावंताच्या तरुण आयुष्यातली एक अंधारयात्रा संपून उजेडापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सांगणारी ठरते..

तसेही गदिमांनी सूचित केले आहे..,

“चला जाऊ दया पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
इथेच टाका तंबू..!!

जाता जाता जरा विसावा
एक रात्र थांबू
इथेच टाका तंबू.!! ”


गीतरामायणाची गोष्ट गदिमांच्या लेखणीतून त्यांच्या आत्मचरित्रात आली असती तर नक्कीच हे आत्मचरित्र अजून मौल्यवान झालं असतं यात शंका नाही..


ज्याची कला लोकजीवनाशी विलक्षण समरस झाली, असा या महान साहित्यिकाचे हे आत्मवृत्त प्रत्येक वाचकांनी वाचायलाच हवे..!!

#पुस्तकायन
Profile Image for Prajakta.
27 reviews4 followers
May 24, 2020
गदिमांचं बालपण, त्यांना यश मिळण्यापूर्वी करावा लागलेला संघर्ष थक्क करणारा आहे. पण यश मिळाल्यानंतरचे त्यांचे अनुभव व तो प्रवास या पुस्तकात नाही. त्यामुळे कदाचित वाचून झाले तेंव्हा काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटत राहिले. अजून त्यांच्या बद्दल जाणूनघ्यावे असे वाटते आहे. पुस्तक वाचल्यावर लगेच त्यांची कारकिर्द घडविण्याचे निमित्त बनलेला ‘राम जोशी’ चित्रपट यूट्यूब वर बघितला. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाशीही ओळख झाली. आणि अपूर्णतेची भावना जराशी कमी झाली.
Profile Image for अनिकेत.
401 reviews23 followers
January 13, 2025
An autobiography with all struggles faced by the author right from his childhood

“एखाद्याला आई नसणं म्हणजे केवढं विलक्षण! एखाद्याला डोकं नाही किंवा पोट नाही म्हटलं तर कसं होईल? आईच नसल्यावर श्रीमंतीला तरी घेऊन काय करायचे”
27 reviews
August 13, 2024
#bookreview

पुस्तकाचे नाव - वाटेवरल्या सावल्या
पुस्तक प्रकार - आत्मचरित्रपर लेख
लेखक - ग.दि.माडगूळकर
प्रकाशन - साकेत प्रकाशन
मूल्य - २२५
पृष्ठ संख्या - १६३.

गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा. मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारं एक अजरामर नाव. मराठीतल्या ज्या अनेक लेखकांच्या असामान्य भाषाशैलीवर मी मातृवत प्रेम केले, त्यापैकी एक म्हणजे गदिमा. गेली काही दिवस या अवलिया कलाकाराच्या जीवनप्रवासाच दर्शन घेता आलं आणि निमित्त होतं गदिमांचं 'वाटेवरल्या सावल्या' हे पुस्तक.

गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक
परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्��ातल्या आठवणी जागवताना 'त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’,असे गदिमा सांगतात. ते सारे दिवस मंतरलेले होते.अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते,
जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते,
असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो. गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते.

गदिमांचं हे लेखन विलोभनीय असून‌ त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो.त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला भावते.

पुस्तकाच्या केवळ प्रस्तावनेवर नजर टाकली तरी एक गोष्ट तत्क्षणी उमगते की, किती विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींशी गदिमांचे निकटचे संबंध होते. या आत्मचरित्रात निवेदनाच्या ओघामध्ये गदिमांनी मा. विनायक, आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, वि.स. खांडेकर, बाबूराव पेंटर, सुधीर फडके आदी कितीतरी व्यक्तिचित्रे नेमक्या शब्दांत आणि सहज शैलीने रेखाटली आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील,नागनाथ नायकवडी यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी देखील गदिमा पुस्तकातून व्यक्त झाले आहेत.

पुस्तकाच्या शेवटाकडे वळताना हे आत्मचरित्र अपूर्ण अवस्थेत राहिलं याची खंत वाचकाला वाटते. पण तरीही जेवढे लिहिले गेले तेवढे ग्रंथबद्ध झाले यांचे समाधान देखील. कारण आज पुस्तक पूर्ण झाल्यानंतर वाटते, चित्रपटसृष्टीतील माडगूळकरांच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंतचा प्रवास लक्षात घेता हे पुस्तक अगदीच अपूर्ण वाटण्याचे कारण नाही. एका कलावंताचे तरुण आयुष्यातील एक अंधार यात्रा संपली आणि पुढच्या उजेडाच्या प्रवासापर्यंत तो कसा येऊन ठेपला ही सांगणारी आत्मकथा म्हणजे हे पुस्तक.

असे हे सर्वसामान्य घटनांतून असामान्यत्वाचे दर्शन घडवणारे पुस्तक आपण सर्वांनी ही वाचावे हेच आत्मनिवेदन.
- गायत्री😇
2,142 reviews28 followers
January 28, 2022
Reading memoirs of someone so well known in one's home literature and poetry of films, and coming across so many of other familiar names, is already thrilling enough. What forms the real cake under all that topping of glitter is the other familiar plethora of details of life, partly those everyone knows of such as world or national level events, some those that a good many of us are familiar with but with different details - a family of aspiring young struggling through poverty and more - and then, finally there's the special touch, via reading of same places, people and events in writings of two famous authors who were brothers, children of the same family quite far apart in age, so one gets a sense of having known of it and yet hearing new details.

वाटेवरल्या सावल्या

Account of the same event by his younger brother, also an author, is very different, naturally - the two were very far apart in age, and thereby in their experiences, memories at al, of the same family.

"त्या संध्याकाळी जेवायला म्हणून मास्तरांच्या घराकडून मी कुशंभटाच्या त्या घरी गेलो आणि जे भकास आणि बीभत्स दृश्य मी पाहिले ते या जन्मात विसरणार नाही. आई एका कोपऱ्यात उदास बसली होती. धाकटी दोन भावंडे घुबडे ओरडावीत तशी सारखी ‘भूक भूक’ करून रडत होती. मोठी मुस्कटून झोपली होती. उदासवाणा पाऊस पडत होता. घरात रकटी अस्ताव्यस्त पसरली होती. निजल्या ठिकाणी म्हाताऱ्या आजीचे प्राण गेले होते. तिच्या अंगावर धड सुडके नव्हते. शेवटपर्यंत आईने हजारदा सांगूनही वडील आपल्या आईला लाज राखायला पुरेसे वस्त्र देऊ शकले नव्हते. आता शेवटच्या वेळीही ते घरी नव्हते. कचेरीत होते. आई मला काहीच बोलली नाही. भिजतभिजत मी कचेरीत गेलो. वडिलांना बोलावून आणले. ते आले आणि आईसारखेच स्वस्थ बसून राहिले. वेड्या आजीसाठी आपण हंबरडा फोडावा असे मला शंभरदा वाटले; पण माझ्या तोंडातून रडूच बाहेर पडेना. काळोख झाल्यावर शेजाऱ्यापाजाऱ्यांना वर्दी लागली आणि माझी अर्धवट आजी अर्धनग्न अवस्थेतच शेवटच्या प्रवासाला गेली.

"लोक म्हणाले, ‘‘सुटली बिचारी!’’"

Both equally pathetic, this one has a grimness mitigated in the other by details that fill out the story of the grandmother and the family, the shifting of the family, and so on.


वाटेवरल्या सावल्या


Again, a tiny part here is familiar from writings of his younger brother and author, Vyankatesh Madgulkar.

"एक अक्षरही न बोलता बाबूरावांनी आपल्या कोटाच्या खिशाला असलेले पेन माझ्यापुढे केले. ते पेन भारी किमतीचे होते. त्याचे टोपण सोन्याचे होते. मला पुढे केलेला हात मागेही घेता येईना. ते पेन मी घेतले आणि भारावल्यासारखा बाहेर पडलो. आपल्या खोलीत आल्यावर त्या पेनकडे मी न्याहाळून पाहिले. ‘आग्फा’ कंपनी आपल्या ग्राहक निर्मात्यांना भेट म्हणून पेन्स देत असे, त्यापैकी पेन असावे ते. ते होते फार सुंदर! मी कागदावर चालवून पाहू लागलो..... कागदावरची अक्षरे जणू निळ्या रेशमाने विणली गेली. लिहिता-लिहिता मी थांबलो. ‘या माणसाने माझ्यावर धरायला छत्र दिले; हाती लेखणी दिली. केव्हाचे ऋणानुबंध असतील त्यांचे आणि माझे? ते धनी — मी चाकर! यांना कारण काय माझ्यावर एवढी मेहरबानी करण्याचे?...’ मला उत्तर सापडले नाही. फक्त डोळ्यांच्या कडा पाणावल्या. घसा दाटल्यासारखा झाला. उगीचच औंधच्या राजेसाहेबांचे स्मरण झाले. वडिलांचा आठव आला. माझ्या जन्मगावाच्या मध्यावर असलेला उत्तुंग कडुनिंबाचा वृक्ष डोळ्यासमोर आला. त्या लिंबाखाली खेळता-खेळताच माझे शैशव बाल्याच्या पायऱ्या चढले होते. आता युवावस्थेतून प्रौढतेकडे जाताना माझ्या मस्तकी एका मानवी वृक्षाने छाया धरली होती. त्याची ख्याती कटुतेबद्दल होती; पण माझ्या डोळ्यांना त्याचा ज्योत्स्ना-धवल मोहर दिसत होता. मनात त्याचा धुंद सुगंध दाटला होता. मस्तकावर त्याच्याच छायेने शितळाई पसरली होती."

The familiar part is about the huge neem tree in his village that already seems a friendly, reassuring presence, such as that of elders, despite having only once read about it so far.


भूमिका

"‘पंचारती’ चित्रपटातील गदिमांच्या एका अभंगात अशा पंक्ती आहेत :

"‘गाव जागा झाला
"आता उठा पांडुरंगा
"उजळली उगवती
"जथे पाखरांचे गाती
"सकाळच्या कळशीत
"आली चंद्रभागा...’"

"‘गुळाचा गणपती’मधील एका गीतात गदिमांनी सूचना केली आहे :

"‘चला जाऊ द्या पुढे काफिला
"अजुनी नाही मार्ग संपला
"इथेच टाका तंबू!
"जाता जाता जरा विसावा
"एक रात्र थांबू
"इथेच टाका तंबू’

"त्याप्रमाणे एखादा विसावा वाचकांनी या आत्मचरित्रात टाकायला हरकत नाही. प्रत्यक्ष ‘काफिला’ पुढे गेलेलाच आहे."

"— आनंद अंतरकर"


येथवरी आहे ऐसा हा प्रकार

" ... जेवता-जेवता आईने एक गोष्ट सांगितली. मी तीन-चार वर्षांचा होतो, तेव्हा कुंडलचे कुणीतरी भास्करभट्ट नावाचे दशग्रंथी ब्राह्मण आमच्या घरी जेवायला आले होते. ते चित्राहुती घालताहेत एवढ्यात मी काहीतरी हट्ट घेतला म्हणून आईने मला मारले म्हणे. मी आत्रस्ताळेपणाने भोकाड पसरले आणि तो ब्राह्मण पानावरून उठून चालू लागला. आईने माझ्या एका चुलत चुलत्याकडून त्यांची पायधरणी केली. ब्राह्मण संतापला.

"‘‘या मुलाला का मारलंस?’’

"‘‘हट्ट करतो फार!’’ आईने रडवेले होऊन सांगितले.

"‘‘या मुलाला मारू नको. हा तुमचा कुणी पूर्वज तुमच्या पोटी आला आहे. हा तुमच्या घराण्याचं नाव त्रिखंडात नेणार आहे. याला मारणार नाही अशी शपथ घे, तर मी या घरी अन्नग्रहण करीन!’’

"‘‘शपथ कशी घेऊ? मूल आहे. कधीतरी हात उगारला जाईल; वचनाला बाध येईल. पण मी ध्यानात ठेवीन. आपण जाऊ नका!’’

"ब्राह्मण जेवला आणि मला आशीवार्र्द देऊन तो निघून गेला. या ब्राह्मणाचे हे अद्भुत भविष्य खरे होण्याची फारशी आशा नाही. पण त्या दिवसापासून आईने असे मला फारसे मारले नाही. बिटाकाका त्यावेळी नव्हता. त्याने मला खूप मारले; पण डोहातून तारलेही. ऋणानुबंधाचे लागेबांधे काय असतात, माणसाचे भूत काय असते आणि त्याचे वर्तमान कोण घडवतो, कोण जाणे. अज्ञात कुणाला वाचता आल�� आहे?"

"कुंडलला गरिबी फार जाणवू लागली होती, त्याचे कारणही हळूहळू मला कळले. अक्काच्या लग्नासाठी वडिलांनी संस्थानाच्या बँकेचे कर्ज काढले होते आणि त्यांच्या पगारातून दरमला सात रुपये हप्ता त्या कर्जाच्या फेडीकडे लावून दिला होता. म्हणजे वडिलांना आता केवळ आठ रुपये मासिक मिळत होते आणि त्यातून एवढा प्रपंच हाकायचा होता. दारिद्य्र येईल नाही तर काय होईल? गावात शेतजमिनी होत्या. घर होते. पण त्यांचे काहीही उत्पन्न कुंडलपर्यंत पोचत नसावे. कुंडलमधला काळ कठीण होता. आठ रुपयांत आईला आमची चिमणी तोंडे भरायची होती. आमची आयुष्ये वाढवायची होती. आ���्हाला मोठे करायचे होते."

"मी गोरा माणूस तोपर्यंत पाहिला नव्हता. अन्यायाच्या गोष्टी मी वाचल्या होत्या. आम्ही सारखे या मंडळीच्या मागे हिंडू-फिरू लागलो. शाळेत आलेले नवे मुख्याध्यापक हिंदुसभावादी होते. त्यांना हे काहीच पटत नसे. ते चिरचिऱ्या आवाजात म्हणत, ‘‘अभ्यास करा लेको! हे भलते छंद तुमचे नव्हेत!’’ फेऱ्या काढण्यापलीकडे आम्ही संस्थानी मुलांनी काहीच केले नाही; पण ‘स्वराज्य झाले पाहिजे’ हा विचार मात्र नाना पाटील आणि यशवंतराव यांनी आमच्यावर निश्चित बिंबवला. त्यांच्याजवळ आम्ही खादी वापरण्याच्या शपथा घेतल्या. ते दोघे निघून गेले. दांडेकरांची मुले शहरात गेली आणि आमच्या प्रभातफेऱ्या थंडावल्या; पण या काळात मला मित्र पुष्कळ मिळाले. पाटील-पुणदीकरांकडून ऐकलेले कैक विचार मी त्यांना सांगू लागलो आणि त्यामुळे ते जणू माझे अनुयाची बनले. किर्लोस्करवाडी, कुंडल ही आमच्या गावापासून केवळ दोन मैल दूर. या गावांत वावरतानादेखील आम्हाला भीती वाटे. आम्ही जंगली मुले. तिथले वातावरण किती सुशिक्षित आणि सुंदर. तिथल्या बायका फिरायला जात आणि पोहत पण. तिथले रस्ते, घरे, सगळेच काही आम्हाला अद्भुत वाटे. लक्ष्मणराव किर्लोस्कर, शंकरराव किर्लोस्कर या व्यक्ती आम्हाला स्वप्नातल्या देवांसारख्या वाटत."

"माझे हस्ताक्षर चांगले होते. आम्ही येतील तसल्या गोष्टी लिहिल्या. मी कविता रचल्या आणि हस्तलिखित मासिक काढले. त्याचे कुणी म्हणाल तर कुणीदेखील कौतुक केले नाही; पण मी मात्र स्वत:च कोरून लिहिलेल्या ‘संपादक : गजानन कुलकर्णी’ या अक्षरांवर मनोमन खूश झालो होतो. माझ्या लेखनकामगिरीला ही अशी आधी संपादक होण्यापासून उलटीच सुरुवात झाली आहे. या मासिकाच्या निमित्ताने मी जे लिहू लागलो ते माझे ध्यान लिहिण्याकडेच लागले. माझ्या या लिहिण्याला आगापीछा काही नसे. मासिकातदेखील ‘सागरेश्वरची ट्रिप’, ‘गंगागिरीबुवाची गोष्ट’ आणि ‘बाबा माझी गांधीटोपी छान’ असाच साहित्यसंभार जमवलेला होता."

" ... आपण कारखानदार व्हावे असे मला वाटू लागले.

"प्रथम प्रारंभ म्हणून मी आणि शेजारच्या मावशीच्या घरातील मुलांनी ‘बटिण्स कारखाना लि.’ नावाची कंपनी काढली. नारळाच्या कवटीपासून कोटाची बटणे आणि खारकाच्या बियांपासून त्याची हातोप्याची बटणे बनवायची, असे त्या कारखान्याचे धोरण होते. एकही बटन पुरे निर्माण न होता ती कंपनी विस्कटली, आणि एकादशीचा खजूर खेळायला नेल्याबद्दल मी आईच्या हातचे रपाटे खाल्ले. कारखाना मोडला."

"एकदा आम्ही असेच स्वातंत्र्याच्या चळवळीचे खेळ खेळत होतो. मी महात्मा गांधी झालो होतो आणि वसंत इंग्रज सरकार. त्याने तुरुंगाची शिक्षा दिली. हा तुरुंग म्हणजे एक मोठा चौकोनी हौद होता. मी त्यात बसलो. इंग्रज सरकारने हौदाचे तोंड बंद केले आणि ते आपल्या नोकरशाहीसह मावशींच्या हाकेवरून निघून गेले. इकडे महात्मा गांधी घामाने भिजले. तुरुंगातल्या धान्यावरच्या किड्यांनी त्यांचे अर्धे रक्त खाल्ले. तुरुंगवास असह्य झाल्यावर त्यांनी हौद वाजवण्यास सुरुवात केली. हौद उघडला आणि तुरुंगवासापेक्षाही कडक फटक्यांची शिक्षा इंग्रज सरकारला मिळाली. वसंताच्या चुलत्यांनी त्याला धरून ओल्या चिपाडाने झोडपला. ‘‘पोर मेलं असतं म्हणजे?’’ असे ते म्हणत आणि पुन्हा मारीत."

" ... मला रामायण, महाभारत, भागवत यातील कथा चांगल्या माहीत होत्या. त्या कथांनी आम्ही खेळत असू. पुराणातले सर्व प्रसंग आम्ही नाटकात वठवल्यासारखे वठवीत असू. कधी रामायणातला समुद्रतरणाचा प्रसंग. त्या वेळी समुद्र म्हणून तिथल्या ओढ्याच्या पाण्यातून सुळकी मारून मी पलीकडे जायचा. रामायणातील मारुती आणि भारतातला भीम ही भूमिका मला सदैव असे. आमच्या या खेळात गावातली चाळीस पोरे येऊ लागली. बाण, तलवारी वगैरे आयुधेही आम्ही पाळू लागलो. अर्थात ही सारी आयुधे स्वयंनिर्मित असत. या खेळात आमच्यांत एक स्त्रीही सामील झाली होती. ती चांगली पंधरा वर्षांची होती. आम्ही खेळवू तशी ती खेळायची. मारुतीच्या खांद्यावर बसणे, दु:शासनाकडून फरफटत ओढले जाणे, या कुठल्याही नाट्यप्रयोगास तिची हरकत नसे. कारण ती बिचारी वेडी होती. वेड्याला खेळात घेऊ नये इतके शहाणपण आम्हाला नव्हते.

"मावशींच्या केळ्याच्या बागेत आमचे हे रामायण-भारत अनेकदा घडून गेले, आणि यातूनच मला नाट्यलेखनाची उबळ आली. पुराण खेळून संपल्यावर आम्ही ऐतिहासिक खेळाला प्रारंभ केला. किर्लोस्करवाडीस काही नाटके मी पाहिली होती. मग इच्छेला येईल ते न बोलता आम्ही मळ्यातल्या खेळातली मी लिहिलेले संवाद बोलू लागलो. संस्थानचे शिक्षणखाते शालेय विद्यार्थ्यांचे ‘विनय’ नावाचे एक मासिक काढीत असे. त्यात गुपचूप हा संवाद मी पाठवून दिला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो छापून आला. मी तो अंक पंधरवडाभर जवळ बाळगला, ज्याला त्याला दाखवला; पण मावशी आणि आई यांच्याशिवाय माझे कुणीच कौतुक केले नाही!

"आई मात्र म्हणाली,

"‘‘श्रीधरस्वामीसारखा कवी होईल माझा अण्णा!’’

"माझी आई अशिक्षित खरी; पण सुशिक्षित स्त्रियांनी हेवा करावा अशी तिची जाज्वल्य रसिकता आहे. घरकाम करताना ती समर्थांची अष्टके म्हणे. सारवताना परिपाठाचा पाठ करी; तर जात्यावर दळताना भराभरा रचून कविता म्हणे. शाळेच्या लायब्ररीतून आणलेले एखादे पुस्तक मी तिला वाचवून दाखवी, तेव्हा ती लक्ष देऊन ऐके आणि अनेकदा त्या पुस्तकातील घटनांचे संदर्भ देई.

"‘सुंदरी तर कुठली नि काय? सारा टेंभा माईसाहेबांचाच!’

"हे हरिभाऊंचे वाक्य ती कुठच्या कुठेतरी मौजेनी वापरी; आणि आपली आई शिकली असती तरी फार थोर विदुषी झाली असती, असे मला नेहमी वाटे. तिला लिहिता फारसे येत नसे. ती सांगे, ‘‘मी लिहायला शिकलेच नाही. फक्त वाचायला शिकले आहे.’’ हे कसे काय घडले असावे याचा उलगडा मला त्या वयात मुळीच होत नसे.

"एकदा वृंदावनापुढे ‘राम’ लिहिताना मी आईला पकडले आणि म्हणालो

"‘‘आएडे, येतंय गं तुला लिहायला!’’

"‘‘पण उजव्या हातानं नाही येत!’’ आई हसत म्हणाली. आई डावखोरी होती. डाव्या हाताने तिला लिहिता येत असे. लोक हसतील म्हणून ती सांगत असे, ‘मला लिहिता येत नाही’ म्हणून!"
................................................................................................


"मावशींच्या शेजारामुळे चार भिंतींच्या आड आमचे दारिद्य्र झाकले जात होते. पण एके दिवशी मावशींच्याकडे आईचा अपमान झाला. मावशींची एक भांडीवाली होती, ती आईचा हेवादावा करी. एका भांडी घासणाऱ्या बटकीने माझ्या आईसारख्या प्रतिष्ठित ब्राह्मण स्त्रीचा हेवा करावा हा प्रसंगच किती भयंकर आहे. त्याचे असे झाले, आई धाकट्या भावाला घेऊन मावशींच्याकडे बसायला गेली होती.

"परसदारी त्या बोलत बसल्या होत्या. माझा भाऊ तेलउंबरीच्या झाडावर चढून फळे काढण्याच्या विचारात झाडाशी खटपट करीत होता. चढता-चढता तो पडला.

"शेजारीच भांडी घाशीत असलेली ती मुर्दाड भांडीवाली मोठ्याने हसली नि ओरडली,

"‘‘दिवा पडला... दिवा पडला!’’

"आईने धावत जाऊन त्याला सावरले आणि त्या बाईला खडसावून विचारले— ‘‘दिवा पडला म्हणजे काय?’’

"ती झटक्याने उठली आणि आईपुढे हात नाचवीत म्हणाली

"‘‘माझ्या पोराच्या पोटी पडायचं ते तुझी पोरं इथं येऊन खातात. दुसऱ्याच्या भाकरीवर पोसावी लागतात तर इतकी पोरं होऊ कशाला दिलीस? त्यातलं एक मेलं म्हणून काय दिवा विझेल तुझ्या वंशाचा?’’

"‘‘श्रीराम!’’ आईने त्या बाईला काहीच उत्तर दिले नाही. तिने मूल उचलले आणि तरातरा घरी आली. त्या क्षणी मावशींनी त्या बाईला कामावरून काढून टाकली. मग तर गावभर माझ्या आईच्या कुचाळक्या करायला, निंदा करायला तिला एकच विषय ��ी ‘बाईला पोरांचं लेंढार आहे; आणि घरात अन्न नाही.’

"मावशीचे उपकार परत घ्यायचे नाहीत म्हणून आईने ती जागा सोडली आणि आम्ही फरशीवरच्या कुशंभटांच्या बिऱ्हाडात राहिलो. ही जागा अगदी आडबाजूला होती. तिथे कुणी येत नव्हते आणि जात पण नव्हते. मावशी येत; पण आई मात्र आता त्यांच्या घरी हळदीकुंकवाला म्हणूनदेखील जाईनाशी झाली.
................................................................................................


"1932 साली कुंडलला एकाएकी प्लेगची साथ सुरू झाली. त्या एवढ्याशा गावात रोज पाचसहा स्मशानयात्रा निघू लागल्या. लोक रानात राह्यला जाऊ लागले. आम्हाला कुठले रान? रानात राह्यला जायचे तर परत माडगुळ्यास जाणे भाग होते. आईने तसे म्हणून पाहिले. पण दादा तिरसटपणाने म्हणाले, ‘‘हं ! गावी जा आणि प्लेगच्याऐवजी अन्नावाचून मर!’’

"इथले जगणे मरण्यासारखेच होते. दादा अत्यंत सज्जन गृहस्थ होते; पण आईला ते फार त्रास देत. संसारात बघत नसत. कदाचित नाइलाजाने ती विरक्ती त्यांना आली असेल.

"माझी आई कोंड्याचा मांडा करून वेळ साजरी करणारी बाई होती; पण मांडा करायला कोंडा तरी हवा ना! भाकरीला पीठ असले तर कालवणाला काही नसायचे. जोंधळ्याच्या पिठाचे पिठले करून आई वेळ मारून नेई. आत्ताआत्ता तिने मावशींकडे जाणे सोडले होते.

"प्लेग आला तेव्हा आम्ही पाच भावंडे झालो होतो. धाकटी लीला नुकती चालतीबोलती झाली होती. वडिलांसारखाच मुलांनी आईला फार त्रास दिला. जिवतीच्या चित्रासारखी तिची सदैव ‘वेढलेली’ अवस्था असे.

"एक पाळण्यात, एक मांडीवर, एक पाठीशी, तर एकदोघे अंगाभोवती. आई म्हणे, ‘‘हा देवाघरचा पानमळा आहे. मोठी झाली म्हणजे सुख लावतील!’’ आईचे मुलांवरील प्रेम वेडे होते. स्वत:ला प्लेग होईल ह्याची तिला धास्ती नव्हती. मुलांना झळ लागू नये म्हणून आपल्या प्राणांचे पांघरुण करण्याची तिची सिद्धता होती.

"आसपासची आळी मोकळी झाली, लोक रानोमाळ झोपड्या बांधून राहू लागले; पण दादा काहीच व्यवस्था करीनात. आईला राहूनराहून मावशींकडे जावेसे वाटे; पण त्या नीच भांड्यावाल्या बाईने केलेल्या अपमानाने ती मनस्वी दुखावली होती. ती सारखी डोळे भरत होती आणि देवाची करुणा भाकीत होती,

"‘‘देवा, माझ्या बाळांना औक्ष दे...’’

"एका संध्याकाळी मावशीच आमच्या घरी आल्या आणि आईवर रागावल्या,—

"‘‘एवढा परकेपणा वाटायला लागला तुम्हाला! त्या दळभद्य्रा भांडीवालीसाठी तुम्ही मला बोल लावणार! मला दूर लोटणार!....’’

"आईला गहिवर आला. मावशीचे डोळेही पाणावले. मावशींनी आपल्या झोपडीशेजारी आमची झोपडी बांधवली आणि बामणकीत राह्यला गेलो. मावशींच्या दयेची गंगा आमच्या झोपडीत झुळझुळू लागली. बाळपणाच्या साऱ्या आठवणींत, या रानातल्या वस्तीत मला फार सुख लागले."
................................................................................................


"शाळा त्यावेळी बंगल्यात भरत होती बंगल्यात म्हणजे बंगल्याच्या अंगणात. कुंडलगावाबाहेर पंतप्रतिनिधींचा एक छोटासा बंगला होता. वार्षिक भेटीसाठी ते आणि राजकुटुंबीय मंडळी तिथे येत. एरव्ही तो मोकळाच असे. त्या बंगल्याभोवती घनदाट आंबराई होती. या आंब्याच्या छायेतच प्लेगच्या दिवसांत आमची शाळा भरे.

"हा बंगला आमच्या वस्तीपासून मैल-दीड मैल दूर. त्यामुळे जाताना ‘दशमी’ बरोबर घ्यावी लागे. पुष्कळ मुले डबे आणीत. माझी आई एका पांढऱ्या सोधण्यात भाकरी-पिठले देई. ते सर्वांसमोर सोडण्यात मला लाज वाटे. मी बंगल्याच्या मागे बसून एकटाच गुटुगुटू खाई. ही आंबराईतली शाळाही माझ्या अजून ध्यानात आहे. त्या झाडाखाली भरलेले वर्ग छान दिसत. तशी शाळा सारखी लाभती तर मी मोठा विद्वान पुरुष झालो असतो."


कोपऱ्यावरचा दिलासा

"आचार्य अत्र्यांनी सहानुभूती दाखवली नसती तर मला प्रवेशच मिळाला नसता. चित्रपट व्यवसायात आज मी जे भलेबुरे यश मिळवू शकलो त्याचा संभवच उरला नसता. मी औंध संस्थानात कुठेतरी मास्तर झालो असतो वा आमच्या घराण्यात परंपरेने चालत आलेले गावाचे कुलकर्णीपण करीत राहिलो असतो. अत्र्यांची-माझी मुळीच ओळख नव्हती. श्री. काळेमास्तरांनी मला दिले तसले ओळखपत्र आचार्य अत्र्यांच्या कैक मित्रांनी माझ्यासारख्या कैक उमेदवारांना दिले असेल. ते सर्व चित्रपटसृष्टीत आले का? नाही. माझ्यातला नाट्यगुण, अभिनयशक्तीकाहीच अत्र्यांनी पाहिले नव्हते. मग हे त्यांनी का केले? कदाचित या प्रश्नाचे उत्तर आचार्यांनाही आज देता येणार नाही; पण त्या वेळी मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मला वाट दाखवलीयशाचा दरवाजा उघडून दिला. रखरखीत उन्हाशिवाय वायुमानच न संभवलेल्या बाळपणातून आयुष्याच्या मार्गाकडे वळताना अगदी कोपऱ्यावर मला दिलासा दिला तो अत्र्यांच्या अभावित सौजन्याने. ते सौजन्य मी कधीही विसरणार नाही कधीही विसरणार नाही!"


पहिला झोत

" ... नवागतांत क्वचित दिसणारे कसब माझ्यात आहे हे चाणाक्ष विनायकरावांनी गुपचूप हेरले. चारदोन संवाद असलेली कुठलीही भूमिका आली की, ते सहदिग्दर्शकांना सांगू लागले, ‘‘औंधकरांना रंगवा!’’"


पंधरा दुणे तीस!

" ... यापूर्वी ‘मनोहर’ मासिकात माझी एक कविता प्रसिद्ध झाली होती. तिच्या खाली मी माझे नाव ‘ग. दि. माडगूळकर’ असे लिहिले होते. माडगूळगावचे जे कोणी कुलकर्णीलोक बाहेर जाऊन मोठे झाले ते ग्रामनामालाच महत्त्व देत होते. मीही तीच परंपरा पुढे चालवली होती.

"‘‘या.’’ व्हाऊचर माझ्यापुढे सारीत वामनराव म्हणाले. मी त्या कागदावर सही केली. ‘पैसा अदा करण्याचे कारण’ अशा छापील अक्षरांपुढे त्या कागदावर शाईने लिहिलेले होते ‘श्री. बाबूराव पेंढारकर यांच्या सांगण्यावरून.’"


सुवर्णाक्षरांचा मान

"बाबूरावांशी मी कधीच बोललो नव्हतो. त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकल्या मात्र होत्या. त्या साऱ्या दंतकथांचा मेळ त्यांच्या या छत्रदानाशी कुठेच बसत नव्हता. शाहुपुरीपर्यंत पोचेतोपर्यंत मी बाबूरावांच्या या कनवाळूपणाचाच विचार करीत राहिलो. त्यांना भेटून त्यांचे आभार मानावे असेही वाटले; पण त्यांची मुद्रा ध्यानात येताच तसे करणे धाष्टर्याचे होईल असे उगीचच मनात आले.

"ती छत्री फारच सुंदर होती. तिचा काळा झगा चिवट रेशमाचा होता. दांडी मुलायम लाकडाची होती. मुठीवर हस्तिदंती नक्षी होती. बहुतेक स्वत: बाबूरावांना हवी असावी या कल्पनेने बझारमास्तरने तो ‘शेलका’ माल आणला होता. न बघताच बाबूरावांनी ती छत्री मला देऊन टाकायला सांगितले होते. इतकी सुंदर छत्री मी कधी वापरली नव्हती. खेड्यात असताना पाऊस आला तर गोणपाटी पोत्याची खोळ कुंचीसारखी पांघरून मी शाळेत जात होतो. त्या दिवसांची आठवण मी विसरलो नव्हतो. माझ्या बाल्यातल्या काही आठवणी विसरण्यासारख्या नव्हत्याच."

" ... ‘ब्रह्मचारी’, ‘ब्रँडीची बाटली’ आणि ‘देवता’ हे तीन चित्रपट निघून गेले. चांगले जोराने गाजले. ... वल्लभभाई पटेलांच्या सभेची दूरदृश्ये घेताना, वल्लभभाईंसारखे कपडे घालून त्यांच्याऐवजी मी चितारलो गेलो. त्याच चित्रपटात दारुडा शेतकरी बनून मी तिरंगी ध्वजाखाली उभा राहिलो. दिग्दर्शक विनायकांनी माझ्याकडून दारू सोडल्याची शपथ घेववली आणि पोलिसाचे कपडे घालून दारू-अड्डे तपासण्याचे काम करायलाही मला भाग पाडले. ... अत्रे-खांडेकरांच्या हस्तलिखितांच्या प्रती करण्याचे काम मला मिळत राहिले. विनायकरावांच्या सहकाऱ्यांनी ते निर्बुद्ध काम बिगारी म्हणूनच माझ्या अंगावर टाकले असेल; पण मला मात्र त्या कामातून लाभ झाला. ... "

"भाऊसाहेब खांडेकरांनी दिलेल्या त्या पन्नास रुपयांवर वडिलांच्या कर्जदारांना मी थोपवू शकलो. गरीब कारकुनाला कर्ज ते किती असणार? त्यातले निम्मेअधिक कर्ज ���ी चुकवू शकलो. बाकीच्या कर्जाची हमी घेऊ शकलो. देणेकऱ्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसू शकला. वडील, आई आणि भावंडे सुखरूप खेड्यापर्यंत जाऊ शकली. निरोप घेताना मला पोटाशी धरून वडील गहिवरून म्हणाले

"‘‘तुझ्या कमाईनं आज बापाची अब्रू वाचली!’’"


‘नवयुग’मधला लपंडाव

""‘लपंडाव’ चित्रपटासाठी काम करीत असताना माझे स्वत:चे गीत चित्रपटात गेले नाही; पण त्यामुळेच अत्र्यांच्या गीतलेखनातील एक वैशिष्ट्य मला काही शिकवून गेले. ​

"‘चल वेच फुले, वेच भराभर सारी गं ​
"ही, हीच वेळ सोनेरी’

"चित्रपटासाठी लिहायचे गीत इतके सोपे आणि एवढे प्रसादपूर्ण असावे लागते. माझ्या ‘नंदादीप’ कवितेतील ‘तिमिरगूढ गाभारा’ श्रोत्यांना दिसला नसता. त्याचे चित्रण ....
Profile Image for Akash Balwante.
104 reviews4 followers
April 16, 2021
मी आतापर्यंत ग . दि . माडगूळकर यांच्या बद्दल लहानपणापासून ऐकत आलो होतो पण त्यांची पुस्तक वाचायचा योग आला नव्हता. हे मी वाचलेले त्यांचे पहिले पुस्तक आणि त्यात खास गोष्ट अशी की हे त्यांचे आत्मचरित्र असा मला दुहेरी अनुभव एकदम मिळाला. गदिमा हे प्रसिद्ध साहित्यिक म्हणून मला परिचित होते परंतु त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल मला अजिबात ठाऊक नव्हते. प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे हे सलग पुस्तक नसून त्यांच्या अनुभवांचे जे अनेक लेख प्रसिद्ध झाले होते, त्याचे हे एकीकरण आहे. पुस्तक अत्यंत सुन्दर रित्या लिहिले असून त्याकाळची चित्रपट दुनिया उत्कृष्ट रित्या उलगडली आहे. खास करून कोल्हापूरची फिल्म इंडस्ट्री जी आज काल कोणाला माहित नसेल. या पुस्तकाचे आपण 2 भाग करू शकतो. पहिला भाग म्हणजे पहिले प्रकरण ज्यात त्यांचा बालपण ते तारुण्याच्या उंबरठ्यापर्यंत चा प्रवास दिसून येतो जो थक्क करून सोडणारा आहे आणि दुसरा भाग ज्या मध्ये इतर सर्व प्रकरणे येतात; त्यात आपण त्यांचे चित्रपट सृष्टीतील अनुभव कथन म्हणू शकतो.
3 reviews
May 22, 2023
Must read

To read autobiography of great legendery write, poet in Marathi is a lesson, who struggle in their day to day life to achieve something.
Never give up, Grab the opportunity and do the best whenever you get it.
This is what, the book tells us.
I would have liked to read further.
9 reviews
March 31, 2021
अत्यंत वाचनीय

गुणवंत लोकांनी संघर्ष प्रत मिळवलेला ध्येय प्राप्तीचा आनंद नेहमीच वाचनीय असतो यात पुस्तकात गदिमा यांनी केलेला संघर्ष व मिळवलेले स्थान हे नेहमीच प्रेरणादायक राहील अतिशय उत्तम पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचावे असे
6 reviews
September 15, 2022
Book of Geet Ramayan poet

Good book. Memories of initial period of GaDeeMaa. Those above 50 age may like.
Do read book. It is nostalgic.
Profile Image for Priyanka Pathrikar.
9 reviews1 follower
December 29, 2023
त्या काळी माणसे कशी घडली हे समजतं. आज एवढा मोठा लेखक एवढ्या संकटातून गेलेला असू शकतो असा विचार मनात येत नाही. खूप प्रेरणादायी पुस्तक.
2 reviews
April 24, 2023
Man you know, struggle you don’t. Excellent book to know about his career and growth.
69 reviews1 follower
August 26, 2022
Amazon Prime reading मध्ये पहिल्या च पानावर ग.दि.मा चं पुस्तक दिसलं आणि एका दिवसात वाचून झाल. खाली ठेवण शक्य नव्हत.
पुस्तक किंवा लेख पेक्षा मंतरलेले चित्रीकरण योग्य वाटत.
त्यांची प्रबळ इच्छा शक्ती, प्रांजळ कबुली आणि प्रयत्नांची पराकाष्ठा ह्या सगळ्यांना प्रणाम कारण मला तरी असं वाटलं नाही की मी वाचत आहे, अनुभव घेतल्यासारखे वाटत आहे.
छोट्या छोट्या गोष्टींचे निरक्षण करून त्या मधून अर्थपूर्ण विचार देने हे तर श्वास घेण्या इतकं सोप्प आहे गदिमां साठी...

बघा...

आमची शाळा जमिनीवर भरे. आताच्या विद्यार्थ्यांसारखे आम्ही अंतराळी बसत नसू.

त्याला माझ्या घरी येणे आवडे. माझी आई आवडे. मला त्याचे घर फारच आवडे. त्याला तिथे नकोनकोसेच वाटे. आयुष्यभर पुढे मी हेच पाहत आलो. प्रत्येकाला दुसऱ्याचे आयुष्य आवडते; पण असतात सारेचजण दु:खी.
3 reviews
August 31, 2022
पुस्तकाची सुरुवात अत्यंत कुशलतेने झाली आहे. प्रारंभी अतिशय विचारपूर्वक गुंफलेली या आत्मचरित्राची सुंदर झालर अचानक गदिमा त्यांच्या व्यावसायिक जीवनाचं रटाळ वर्णन देत मळकट करतात आणि मग हिरमोड होतो. यामुळे पुस्तकाचे दोन भाग आहेत असाच प्रत्यय येतो. पहिला जो त्यांचे हलाखीचे बालपण अगदी हृदयद्रावक पद्धतीने सांगून मनाला अक्षरशः खिळवून ठेवतो तो व दुसरा जो त्यांच्या नाटक आणि चित्रपटसृष्टीतले विविध किस्स्यांशी, गमतींशी वाचकांची ओळख करून देतो तो. हा दुसरा भाग जरी त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असला तरीही त्याला पहिल्या भागासारखी भावनिक बाजू नाही. असो, मी गदिमा यांच्या लिखाणाला नावे मुळीच ठेवू इच्छित नाही आणि तेवढी माझी सिद्धता देखील नाही. ज्यांना त्यांच्या वैयक्तिक वा कौटुंबिक जीवनाबद्दल अधिक स्वारस्य आहे, त्यांना हे पुस्तक एक अर्धवट राहिलेली एक सुंदर रांगोळी वाटेल.
Displaying 1 - 14 of 14 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.