दोन कॉलेजवयीन मैत्रिणींच्या पुणे ते गोवा बाईक प्रवासाची थरारकथा आहे "एकदम बिनधास्त"! दुचाकीवरून एवढ्या दूरवर सहलीचा आनंद घेता यावा या सरळ साध्या विचाराने सुरु झालेल्या या प्रवासाने पुढे मात्र वेगळेच वळण घेतले. न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना अटकेला सामोरे जावे लागले. तेव्हा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुरुंगातून पळून जाण्यापासून ते घोडेस्वारी करून खरा गुन्हेगार रंगेहात पकडून देईपर्यंत वाटेल ती जोखीम पत्करली या जोडगोळीने ! तरुणाईच्या ताज्या भाषेत लिहिलेली ही कथा अलगद तुम्हालाही तुमच्या फॅंटसीत नेऊन सोडेल. कदाचित त्यांनतर शेजारून झुईंग करत कट मारून बाईकवरून जाणारी बिनधास्त तरुणी दिसली की क्षण दोन क्षण तुम्हाला ती कथेतील नायिकाच वाटून जाईल.
'Book description' मधे पुस्तकाचा विषय थोडक्यात दिलेला आहे, म्हणून इथे परत देण्याचं टाळते. त्यावरून किंवा नावावरूनही हे पुस्तक तरुणाईसाठी आहे हे लगेच कळून येते, आणि त्यासाठी वापरलेली भाषाशैली अप्रतिम! खरंतर 2 stars त्यासाठीच. कथा मात्र खूप वेगळी नाही, इथेच आपली निराशा होते.
सुरवातीपासून 2 मैत्रिणींची ही रहस्यकथा खूप उत्सुकता वाढवते. छोट्या छोट्या chapters मधे पुस्तक विभागलेलं असल्यामुळे कंटाळवाणंही होत नाही. कथेचा वेगही उत्तम. पण थोड्याच वेळात पुढे काय होणार याची कल्पना यायला लागते. काही bollywood movies मधे असलेली गोष्टंच थोड्याफार फरकाने वाचायला मिळते. काही ठिकाणी थोडी अतिशयोक्ती केल्यासारखंही वाटून जातं. नंतर कथेतही रोमांचकता राहत नाही. आणि शेवटही खूप सहजपणेच होतो. भाषा fresh असली तरी कथा अजिबात नवीन वाटत नाही (जर हिंदी चित्रपट बघितले असतील तर). कथा वेगळी आणि नवीन असती तर वाचायला नक्कीच मजा आली असती.