ओह माय गोडसे’ ही गांधी आणि गोडसे या दोन प्रवृत्तीमधल्या द्वंद्वावर भाष्य करणारी कादंबरी आहे. निव्वळ भाष्य नव्हे तर त्यांच्यातलं द्वंद्व कथेच्या रुपात उभं करणारी कादंबरी आहे. ‘गांधी कभी मरते नही’ असं आपण नेहमी म्हणतो. पण गांधी मरत नाहीत म्हणून नथुराम संपला, असं समजून कसं चालेल? या दोन्हीही प्रवृत्ती आणि यांच्यातलं द्वंद्व हे चिरंतन आहे, हे सूत्र सांगणारी ही कादंबरी आहे. गांधींभोवती त्यांच्या खुनानंतर जाणीवपूर्वक भलंमोठ गैरसमजाचं जाळं उभं केलं गेलेलं आहे. आणि ही गैरसमजांची जळमटं दूर करण्याचे काम ही कादंबरी नक्की करत असली तरी त्यातून फक्त गांधीच नव्हे तर ‘नथुराम’ ही प्रवृत्तीदेखील आपल्याला उलगडत जाते. ‘ओह माय गोडसे’ ही कथा प्रामुख्याने दोन मित्रांची, दोन विचारांची, दोन प्रवृत्तीमधल्या द्वंद्वाची आहे. गांधी-नथुराम पुन्हा भेटले तर...? आणि भेटले तर काय होईल? हा प्रश्न सातत्याने विचारी माणसाला पडतो. या कादंबरीत या प्रश्नांची उत्तरं लीलया सापडतील. ५५ कोटी, फाळणी, मुस्लीमअनुनय, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यलढ्यातील गांधींच नेमकं योगदान या आणि अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकत पुढे जाणारी ही कादंबरी वाचकांना ‘गांधींचा खून नेमका कशासाठी झाला?’ या ऐतिहासिक सत्यापर्यंत आणून ठेवते.
मागे गांधी-गोडसे चित्रपट पाहिला होता त्याचा विषय दोन्ही बाजूंची विचारसरणी मांडणे हा होता परंतु दोन्ही बाजूंचा समन्वय साधण्याच्या नादात चित्रपट दोन्हीपैकी एकाही विचारसरणीचे पूर्णतः समाधान करण्यात अयशस्वी ठरला. परंतु इथे लेखकाने पुस्तकात गांधींच्या विचारांचे समर्थन करत गोडसेवादींच्या विचारांचा फोलपणा दाखवून दिला आहे. कथेत अभिराम हा आरएसएस शाखेच्या विचारसरणीने प्रभावित होऊन मी नथुराम गोडसे हे नाटक दोनदा पाहून तसेच त्यावर आधारित गोपाळ गोडसेंची दोन पुस्तके (55 कोटींचे बळी व गांधी हत्या आणि मी) वाचून मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि हॅलॉजिनेशन या मानसिक रोगामुळे स्वतःला नथुराम समजू लागतो आणि त्याला नीट करण्यासाठी डॉक्टर कामत हे गांधी आणि गांधी आश्रम पुन्हा निर्माण करून गांधींची बाजू आणि विचार अनोख्या पद्धतीने अभिराम उर्फ नथुराम समोर मांडत उपचार करू लागतात. गांधी हे हाडामासांचे माणूस असल्याने त्यांच्यामध्ये ही गुणदोषांचा समुच्च्य आढळून येतो. गांधी विरोधी लोकांनी त्यांची प्रतिमा नेभळट, पुळचट, मुस्लिमप्रेमी, फाळणीला जबाबदार अशी करून खऱ्या गांधीपासून तरुणांना लांब ठेवले. सुरुवातीला फक्त काही लोक आणि भागापुरती मर्यादित असलेली स्वातंत्र्य चळवळ गांधींनी भारतभर आणि पर्यायाने जन्मसामान्यांपर्यंत पोहोचवली. जगात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्य लढा देणारे बरेच जण आढळतील परंतु अहिंसक मार्गाने जुलमी ब्रिटिश शासनाविरुद्ध सर्वप्रथम लढणारे म्हणून महात्मा गांधींचे वेगळेपण वादातीत आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन मार्टिन ल्युथर किंग जुनियर आणि नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या देशामध्ये चळवळी उभ्या केल्या. गांधी समजून घेण्याआधी पहिल्यांदा आपल्याला मोहनदास समजून घेतला पाहिजे जो आयुष्यभर यशस्वी तसेच अयशस्वी प्रयोग करत राहिला. फाळणी ही जिन्नांची इच्छा होती आणि त्याला इंग्रजांनी खतपाणी घातले तसेच सावरकर यांनी या भारतात हिंदू आणि मुस्लिम अशी दोन राष्ट्रे आहेत असे सांगून तसेच टिळकांनी लखनौ करारात वेगळ्या मुस्लिम मतदारसंघाला मान्यता दिल्याने ही विषारी विचारसरणी आधीच जन्माला आली होती. पाकिस्तान वेगळा झाल्यावर करारानुसार राहिलेले 55 कोटी रुपये भारताला देणे बंधनकारक होते अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की झाली असती. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर सर्व भारतीयांना एकत्र आणावे लागणार होते आणि त्यात हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही ओघानेच आले, यासाठी गांधींना काही वेळा हिंदू बहुल भारतात मुस्लिमांचा अनुनय करावा लागला. गांधी हत्येचे याआधीचे अयशस्वी प्रयत्न हे फाळणी आणि 55 कोटी हे मुद्दे उपस्थित होण्याआधीच झाले होते. अश्या तर्काने उत्तर देऊन गांधीवरील आरोपांचे लेखकाने खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात मुख्यत्वे मवाळ, जहाल आणि अतिजहाल(सशस्त्र) या विचारसरणी होत्या त्यात महाराष्ट्रात या तिन्हीचे नेतृत्व अनुक्रमे नामदार गोपाळ गोखले, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे चित्पावन ब्राह्मणच करत होते. वासुदेव फडके, चाफेकर बंधू हे क्रांतिकारक तसेच नथुराम गोडसे हेही ब्राह्मणच होते. सन 1920 पूर्वी फक्त उच्चशिक्षित आणि ब्राह्मणांपुरती मर्यादित असलेली चळवळ गांधी (वर्णाने वैश्य) यांनी बहुजनांत पसरवून त्याचे नेतृत्व स्वतः कडे घेतले. आणि याचाच राग ब्राह्मणांनी धरून हिंदुत्वाच्या नावाखाली गांधी हत्या घडवली अशी वेगळीच कन्स्पिरसी थियरीही अप्रत्यक्षपणे सुचवत मांडली आहे. तसेच न्यायालयात निर्दोष सुटलेल्या सावरकरांना पुराव्याअभावी सुटल्याचे सांगून तसेच नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांचे ते मार्गदर्शक होते असे म्हणून सावरकरांनाही अप्रत्यक्षपणे गांधीहत्येला जबाबदार ठरवले आहे. एकंदरीत फक्त शीर्षक वाचून गोडसेवादींना आपले वाटणारे परंतु वाचताना गांधीवादींना आपलेसे वाटणारे असे हे पुस्तक एकदा वाचायला हवे.