पु, लं. चा विनोद आपल्याला पुनः पुन्हा हसवत असतो. त्यांची आठवण, त्यांची पात्रं आणि त्यांच्यासारखी शैली पुनश्च वाचकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न! 'पु. ल. - अखेरचा अध्याय', 'बटाट्याची चाळ - बाजीराव आणि मस्तानी', इत्यादी कथांमधून. आणि त्याचबरोबर थोडंसं अ-पुलंही! - काळानुसार बदललेल्या अनेक नवीन व्यक्ती आणि वल्लींतून. अन् प्रसिद्ध घटनांच्या आणि व्यक्तिमत्त्वांच्या उडवलेल्या खिल्लीतून! काही प्रतिक्रिया - 'शेवटपर्यंत हा लेख खरोखरीच पु. लं. चा आहे असे समजत होतो. शेवट वाचताना हा तुम्ही लिहिल्याचे लक्षात आले. फारच आवडला.' '’बटाट्याची चाळ, बाजीराव आणि मस्तानी' म्हणजे 'बाय वन, गेट वन फ्री!' 'आपल्या लेखणीतून भाईकाका बघायला मिळाले!' 'गद्य लेखनातही आपली चांगली हातोटी आहे याची प्रचीती पु. लं.
पहिल्यांदा शाळेत पुलं पाठ्यपुस्तकातून भेटले. नंतर कॉलेजच्या लायब्ररीत त्यांच्या पुस्तकांनी वेड लावले. पुढे युट्युबवर त्यांचे कथाकथनाचे व्हिडिओही खूप ऐकले. पुलंनी उभे केलेले व्यक्तीचरित्र इतके प्रचलित आहेत की त्यांच्या पंचलाईन्स अजूनही काही मित्र ऐकवतात.. अशा पुलंच्या विश्वात शिरून, मूळ गाभ्याला धक्का न लावता, त्याचा पुढे विस्तार करण्याची कमाल श्री. कुमार जावडेकर यांनी 'निवडक अ-पुलं' : (थोडं पुलं, थोडं अपुलं!) ह्या पुस्तकात साधली आहे. ह्यातल्या छोट्या छोट्या कथांमध्ये तीच लकब जाणवते. ती चरित्रे आज कशी वावरली असती हे वाचतांना उत्सुकता अधिक खिळवून ठेवते. पुस्तकातील कथा फार रंजक आहेत, जावडेकरांची रसिकता आणि व्यासंगी लिखाण विशेष, कंसातले खुलासे आणखी मजा आणतात, बरेचदा तर पुलंच्या तोंडून कथाकथन ऐकतोय असे वाटायला लागतं. त्यांचा आवाज कानी पडतो. इतकी हुबेहूब लिखाणाची शैली, ह्यात अगदी गदागदा हसायला येत नाही पण संयमित हास्यउकळ्या एकसारख्या जाणवतं राहतात तर कधी वैचारिक पीळही मिळतो. त्यात काही काळ आपण रोजचा सर्व ताणतणाव विसरून रमतो आणि शेवटी खूप फ्रेश वाटतं..
बरेचसे अपुले अप्रतिम लिखाण आणि सर्व कोट्या अगदी ओरिजिनल असल्याने गम्मत आणतात. कुमारचे मराठीवरील प्रभुत्व ठायीठायी जाणवते. ज्यांनी पुलं वाचले नसतील त्यांना देखील आवडेल असे लिहिले आहे.
मला आवडलेल्या काही कोट्या - "'मोदी' लिपी, 'कॉर्न क्लब' ची कोटी, मराठी माणूस आणि त्याचे पुस्तक प्रेम. काही नवीन शब्द उल्लेखनीय आहेत. जसे 'मूळाबरहुकूम', गीतावळ्यात, सामीर्य.
तुम्ही पुलंचे चाहते असाल तर एकदा हे पुस्तक नक्की वाचा.