गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली.
Gajānan Digambar Mādgulkar was a Marāthi poet, lyricist, writer and actor from India. He is popularly known in his home state of Maharashtra by just his initials as Ga Di Ma (गदिमा). He was awarded Sangeet Natak Akademi Award in 1951 and Padma Shri in 1969.
"या संग्रहाचे संकल्पन कै. ग. दि. तथा अण्णासाहेब माडगूळकर यांच्या हयातीतच झालेले होते. प्रकाशनाच्या संधीची वाट मात्र हा ग्रंथ गेली तीनेक वर्षे पाहत होता.
"अण्णासाहेबांच्या चतुरस्र लेखणीतून वेळोवेळी साकारलेली काही व्यक्तिचित्रे माझ्या वाचनात आलेली होती. ती बरीचशी दैनिकांच्या रविवारच्या आवृत्तींतून प्रसंगविशेषी प्रसिद्ध झालेली होती. काही मासिकांतून, दिवाळी अंकांतून आलेली होती. ‘बंडित बुराणिक’ हे व्यक्तिचित्र खुद्द माझ्याच ‘मोहिनी’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले होते. ... "
" ... गेल्या दोनअडीच दशकांत मराठीत काही उत्तम व्यक्तिचित्रसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘व्यक्ती आणि वल्ली’ (काल्पनिक व्यक्तिचित्रे) आणि ‘गुण गाईन आवडी’ (वास्तव व्यक्तिचित्रे) हे पु.ल. देशपांडे यांचे संग्रह, ‘मुद्रा’ (पु. भा. भावे), ‘व्यक्तिवेध’, ‘प्रकाशातील व्यक्ती’ आणि ‘आगळी माणसे’ (प्रभाकर पाध्ये), ‘दीपमाळ’ (चिं. त्र्यं. खानोलकर), ‘शतपावली’ (रवींद्र पिंगे), ‘सहवास’ (कृ. द. दीक्षित), ‘आवडलेली माणसे’ (विद्याधर पुंडलीक) ही अशा काही संग्रहांची सहज आठवलेली नावे. या पार्श्वभूमीवर गदिमांचा प्रस्तुत संग्रहही खचितच लक्षणीय ठरेल."
"या संग्रहातल्या नुसत्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली तरी एक गोष्ट तत्क्षणी उमगते की, किती विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींशी माडगूळकरांचे निकटचे संबंध होते. त्यांची लेखणी या व्यक्तींमधल्या माणुसकीचा सतत वेध घेत असते. त्यांच्या जीवनातल्या लहानसहान प्रसंगांतूनही मोठा आशय मांडते. सर्वसामान्य घटनांतून असामान्यत्वाचे दर्शन घडवते. मनुष्यजीवनातल्या काही निष्ठांवर, आदर्शांवर आणि मंगल मूल्यांवर माडगूळकरांचा नितांत विश्वास आहे. या संग्रहातील पुष्कळशा लेखांना त्यांच्या अस्सल भारतीय तत्त्वचिंतनाचा परिसस्पर्श झालेला आहे. ....
"माझी आई
"महाराष्ट्रीय कुटुंबातून एक परंपरा चालत आलेली आहे. एकाच कुटुंबातील भावंडे, व्यवसायधंद्याच्या निमित्ताने चहू दिशी पांगतात, तेव्हा घराण्याचे देव थोरल्या भावाकडे येतात. आमच्या कुटुंबात मी थोरला. त्यामुळे माझ्या वृद्ध मातोश्री माझ्याकडे असतात."
" ... तिच्याशी बोलत बसले, तर उठावेसे वाटत नाही. तिचे बोलणे रसाळ, भाषा अलंकृत म्हणींनी आणि उद्धरणांनी खचलेली असते. तुकोबा, ज्ञानोबा, समर्थ यांची वचने पुन:पुन्हा तिच्या बोलण्यात येतात. तिच्या बोलण्यात कैक जुने वाक्प्रचार अजून वावरत असतात. कुणाच्या आर्थिक दारिद्य्राची परमसीमा वर्णिताना ती म्हणेल, ‘‘बिचार्यापाशी एक शिवराईदेखील राहिली नाही बघा.’’ आता ‘शिवराई’ हा शिवशाहीतला पैसा आईच्या वाचासाम्राज्यात ते अजूनही चलनी नाणे आहे.
"संध्याकाळचे पाचसाडेपाच वाजलेले असतात. मोठ्या सूनबाई, नाती, नातसुना यांना आईसाहेब काहीतरी असे सांगत असतात. एकाएकी त्यांच्या लक्षात येते की, सायंकाळ झाली आहे. जमिनीला हाताचे रेटे देत उठण्याचा आविर्भाव करीत त्या सर्वांना उद्देशून म्हणतात, ‘‘अगं, उठा उठा. पोरं येतील आता दीन गाजवीत. चहाच्या तयारीला जा लागा.’’
"‘पोरं’ या शब्दांत माझादेखील अंतर्भाव असतो. माझी मुले, मुली, मुलींची मुले या सर्वांसाठी ‘पोरं’ हे एकच सर्वनाम वापरते आई. ‘दीन गाजवीत येणे’ हा वाक्प्रचारही असाच ऐतिहासिक. यवनांच्या फौजा हमले करताना, कोल्हाळ करीत ‘दीन दीन.’
"आईच्या या गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे तिला पुण्यातही मैत्रिणी पुष्कळ लाभल्या आहेत. चार वाजून गेेले की, त्या हळूहळू आमच्या घराकडे येतात. त्यातल्या एकदोघी खास आमच्या मुलखाकडच्या आहेत. पंढरपूरच्या आसपास वसलेल्या एखाद्या खेड्यातून आलेल्या. तिच्याच वयाच्या. बहुधा शेतकरणी. पाऊस, पेरणी, भांगलण, काढणी, मोडणी, खळी, सुकाळ, दुष्काळ यासंबंधी या बायका तासन्तास बोलत राहतात. ‘लेले’, ‘गोडबोेले’ अशा उच्चभ्रू आडनावांच्याही आईच्या काही मैत्रिणी आहेत. त्यांच्याशी ती बहुधा ‘प्रपंचपरमार्थ’ इत्यादी विषयांवर बोलत असते. दररोज यातील काहीजणी आईकडे येतातच. मग या सार्या मैत्रिणी पायी फिरत फिरत फर्लांगदोन फर्लांग जातात. कधी वाकडेवाडीच्या विठ्ठलाला, एस.टी. स्थानकावरच्या दत्ताला, तर कधी पोस्टाजवळच्या गणपतीला. देवापर्यंत नाही चालवले तर एखादा पार नाहीतर पुलाचा कठडा पाहून त्या सर्वजणी बसतात. पुन्हा बोलणी. वाणीचा उत्सव अखंड चालू असतो. माझा धाकटा भाऊ व्यंकटेश एकदा मौजेने मला म्हणाला, ‘‘अण्णा, आई बोलत्येय बघ कशी मुद्देसूद!’’
"एका क्षणाचाही विलंब न लावता आई त्याला म्हणाली, ‘‘लेका, तू एक लेखक आहेस. माझ्या पोटी तीन लेखक जन्माला आले. मलाही काही बुद्धी असेलच की!’’"
" ... तसा तिचा उभा जन्मच खेड्यात गेला. तिचे माहेरगाव शेटफळे हे जुन्या औंध संस्थानातलेच एक चिमुकले खेडे. माझ्या माडगुळात आणि आईच्या जन्मगावात चारपाच मैलांचे अंतर असेलनसेल.
"आईचे ते माहेरगावही अद्भुत. माझ्या बालपणी तिथे जायचे तर घोड्यावरून जावे लागे. गाव सारा खानदानी मराठीजातीचा. बहुतेकांचे आडनाव गायकवाड. त्यांचे सोयरसंबंध मोठमोठ्या सरदारांशी, राजघराण्यांशी, शेंबड्या पोरांचीही नावे दादासाहेब, बाबासाहेब, अप्पासाहेब, भाऊसाहेब आणि आबासाहेब. बायका सार्या गोषात. त्यांचीही नावे आत्यासाब, वैनीसाब या थाटाची. कुंवारणी थोड्या मोकळेपणाने वावरत; पण त्याही अक्कासाब, ताईसाब.
"माझ्या आईचे माहेरघर हे एकच त्या गावात ब्राह्मणाचे घर. आईचे वडील काशिनाथपंत त्या गावचे पिढीजात कुलकर्णी. त्यांच्यापाशी जमीन बक्कळ. पोटी पुरुषसंतान मात्र नव्हते. तीन मुलीच! तर त्यातली एक तर जन्मत:च मुकी आणि बहिरी होती म्हणे. मी तिला कधी पाहिले नाही. माझी आई सर्वांत मोठी. आईचे माहेरचे नाव बनू. मुक्या बहिणीचे नाव गोदावरी होते. ती मधली. आणि धाकटी होती, तिला म्हणत चन्ना. या चन्नामावशीचे मात्र आमच्याकडे येणेजाणे होते. मला आठवते, आई आणि मावशी एकमेकींना भेटल्या की, मनसोक्त रडायच्या. चन्नामावशीला तिच्या सासरी फार सासुरवास होता म्हणे. पुढे ही मावशी जेव्हा स्वतंत्र झाली म्हणजे तिच्या सासरची वडील माणसे जेव्हा एकूण एक वैकुंठवासी झाली तेव्हा तिच्याकडून दरवर्षी आमच्याकडे रायवळ आंब्यांनी लादलेले घोडे येऊ लागले.
"आई सांगते, ‘‘साखळ्यावाळे घालून मी माडगूळकरांच्या वाड्याचा उंबरा ओलांडला. धान्याचा शेर सांडला. घरात आजेसासू होती. फार कर्तबगार आणि शहाणी बाई होती ती. स्वभावाने प्रेमळ, उदार आणि सासरे तर विचारायलाच नको. शरीराने आणि करणीनेही मोठा कर्ता माणूस. पंचक्रोशीवर त्यांचा दबदबा. सरकारीदरबारी वजन. बाबा बामण बोलला की बोलला! त्याचा शब्द झेलायला अवघा गाव पुढं व्हायचा. ... "
"माझ्या जन्मापर्यंत म्हणजे एकोणीसशे एकोणीस सालापर्यंत माझे आजोबा हयात होते. त्या बलदंड ब्राह्मणाने चक्क ग्रामणी करून जमिनी संपादल्या होत्या. तीन गावची वतने मिळवली होती. घरचा बारदाना मोठा होता. बाबा बामण गावचा कारभारी होता. पाटीलकुलकर्णी जिवाभावाचे मित्र होते. या बामणाच्या कारकीर्दीत आईने सुख आणि सुखच उपभोगले. तिच्या माहेरी कुलकर्णी काम करणारा बामण जिता राहत नसे. वर्षासहा महिन्यांत कुठेतरी आडरानात त्याचा खून पडे. बाबा बामणाने व्याह्याची कुलकर्णी आपण तिथं जाऊन पाच वर्षे केली; पण केसाला ढका लावून घेतला नाही. खून करवले, केले; पण एक खरवड अंगावर उमटू दिला नाही.
"माझे आजोबा मरताना माझ्या आईला म्हणाले होते, ‘‘मुली, आतापर्यंत निभावलंस. माझ्या आईच्या ��ाघारी मलादेखील तू लेकरासारखं सांभाळलंस. पुढचा काळ कठीण आहे. तुझा नवरा संत माणूस आहे. त्याला प्रपंचातलं काही कळत नाही. आमच्या माघारी तुमच्य��� दावणीला दोन पायांचं कोंबडं उरणार नाही. आज चिंच आली घरात, तर गूळ द्यायला पंधरवडा उलटून जाईल.’’
"बाबांचे भाकीत शब्दश: सत्य ठरले. वडील गावात राहिलेच नाहीत. पिढीजात कुलकर्णीपण त्यांनी चारदोन वर्षे केले; पण गावगुंडी या शब्दाविषयीदेखील त्यांना किळस होती. त्यांनी कुणाची पै खाल्ली नाही. कुणाच्या पाचोळ्यावरदेखील पाय दिला नाही. त्यांनी सरळ नोकरी धरली आणि जन्मभर ते ती नोकरीच इमानइतबारे करीत राहिले.
"औंध संस्थान ते केवढे. तिथल्या मामलेदारालाच तीस रुपये द.म. पगार असायचा. मग कारकुनाला काय मिळणार? मिळत असतील पंधरावीस रुपये.
"माझ्या आईने संसार केला. अबु्रदारपणे संसार केला. वडिलार्जित जमिनीतला एक गुंठादेखील विकला नाही. वडिलांना नोकरीच बरी वाटत होती. आईला शेतीचा हव्यास होता. तिला वाटे, गावच्या चारी दिशांना आपली काळी असावी. चारी दिशांनी मोटांची कुरकुर आणि मोटकर्यांची गाणी ऐकू यावी. वाड्याचा सोपा कणगीदळणांनी भरून जावा. माळवद मिर्च्यांच्या वाळवणाने लालभडक व्हावे; तर वाड्याच्या अंगणात शाळू उन्हाला पडावी. उभ्या जन्मात तिने वडिलांना विरोध केला नाही. उलट शब्द तर चुकून उच्चारला नाही. त्यांच्या पद्धतीने तिने त्यांना राहू दिले, संसाराचा भरीभार आपल्या माथी घेतला."
" ... जमिनीची नांगरण, कुळवण, बांधबांधोर्या, बीबियाणे, सारे वेळच्या वेळी करवून घेण्याचे काम आईच करी. करते वाटेकरी कुचराई करू लागले तर आई त्यांना अशी धारेवर धरी की, देखते रहना! वाटेकरी तिला घाबरून असत."
"कोंबड्याने पहिली बांग दिली की, ती उठायची. परसदारी जाऊन दात घासणे, तोंड धुणे उरकायची. एका पायाची मांडी आणि एक पाय पसरलेला अशी ती जात्याशी बसायची. दळण सुरू व्हायचे. मुक्याने नाही; चांगले ओव्या गात -"
"आईचे हे गाणे चालू असताना, जात्याच्या पाळ्यातून चांदण्यासारखे पीठ गळत राही. मी जागा झालेला असे. माझ्या डोळ्यांतून उगीचच गरमगरम आसू ओघळू लागत."
:‘जी.’’ महारीण म्हणे. बामणाच्या बाईने आपल्या नवर्याचा उल्लेख ‘अर्जुनभावजी’ असा केल्याने गंगा मनोमन सुखावे. नम्र आवाजात म्हणे, ‘‘कोरड्याशाला बी ’’
"‘‘अगं रानातनं घेऊन जावं काही. करडी आहे, हरभरा आहे. चोरंमोरं नेतात, तुम्ही तर कामाची माणसं. बरं, आठवण द्यायला सांग भावजींना. मटकीची डाळ देईन मापटंभर जा.’’
"गंगा निघून जाई. आई गोठ्याकडे वळे. गड्याने गोठा साफ केलेला असे. आई गाईंची धार काढी. दुधाची कासंडी आत आणी. चुलीला पेटू घाली. तुरकाट्यापळाट्यांनी ती नीट पेटली म्हणजे ती माजघरात येई आणि हलक्या आवाजात माझ्या आजीला म्हणे, ‘‘सासूबाई, उठू नये का आता? तांबडं फुटलं, चूल पेटलीय.’’
"आजी उठे. स्वयंपाकघराकडे जाई. दूध तापत ठेवणे हे तिचे काम असे. आई अंगणात जाई. घंगाळभर पाण्यात गाईचे ताजे गोमय मिसळी आणि सडा शिंपू लागे. त्या शिंपण्याचा स्वर आत माझ्या कानापर्यंत येई. मी कुणा गोसाव्याचा आशीर्वाद ऐकला होता. त्याच्या भाषेतला. त्या शब्दांशी त्या सड्याचा आवाज बरोबर जुळता असे.
"‘अच्छा हो भला... अच्छा हो भला...’
"सडा संपता संपता आभाळ उजळू लागे. मग आई रांगोळ्या काढी. गाईची पावलं, कमळं, चक्रं आणि विठोबारखुमाई या तिच्या लाडक्या आकृती. आई डावखोरी आहे. रांगोळ्यादेखील ती डाव्या हाताने काढी. सारेच महत्त्वाचे ती डाव्या हाताने करी. जणू घरगृहस्थी हा तिच्या डाव्या हाताचा खेळ., सडारांगोळी झाल्यावर तिचे स्नान आटोपे. मग ती आम्हाला हाक मारी, ‘‘अक्का, अण्णा, उठा रे! उन्हं आली अंगावर.’’
"मग आमच्या उस्तवार्या. आम्ही शाळेत गेलो की, पुन्हा घरकाम, स्वयंपाक, जेवणखाणी. चहाचे प्रस्थ त्यावेळी खेड्यापाड्यात मुळीच नव्हते. लाह्याचे पीठ, मटक्याची उसळ, ताजी दुधातली दशमी अशीच काही न्याहारी आम्हाला मिळे. बाजरीची असेल ती. काल रात्रीची भाकरीदेखील आजच्या न्याहारीला निषिद्ध नसे.
"संध्याकाळी ती न विसरता देवाला जाऊन येई. आम्हाला लवकर जेवू घाली. वेडी आजी सोवळी झालेली होती. तिला काही निर्लेप भाजके खावे लागे. ती स्वयंपाकघरात एकटीच बसून गुलुगुलू खाई. आजीच्या आधी आई कधीच जेवत नसे. आजीचे झाल्यावर ती जेवे. तिला झोप लागल्यावर मग ती आडवी होई."
"‘‘धर्मा का रे?’’ आई विचारी.
"‘‘जी वैनी.’’
"‘‘अरे, रात्री अंगणात पडायला येत जा तुमच्यापैकी कुणी. मुलांना भय वाटतं.’’
"‘‘जी, येतो की! आमचं ध्यान असतंच की! पर आजपासनं म्हातार्याला सांगतो यायला.’’
"म्हातारा तात्या रामोशी कुर्हाडीला उशाला घेऊन आमच्या अंगणात झोपे. समोरच्या घरातल्या कासारणी खालच्या सोप्यात पडायला येत. सोबत होई. गावात होतो तोपर्यंत आम्ही सुखात होतो. श्रीमंती नव्हती; पण कमतरता नव्हती. गावकर्यांचं प्रेम होतं. आजोबांच्या पुण्याईचं छत्र होतं. वडील जवळच्या तालुक्याच्या गावी बदलून आले आणि दैन्याला आरंभ झाला. खाणारी तोंडे वाढली. खर्चाच्या वाटा वाढल्या. आपल्या गावात धान्य, भाजीपाला, जळण, दूध यापैकी कशासाठीच पैसा वेचावा लागत नव्हता. खायचे तेल आणि दिव्यांचे तेलही आपल्या रानात पिकत होते. करडीचे तेल तुपाच्या तोंडात मारील इतके चवदार. समयांना घालायचे करंजेल. गावओढ्याच्या दोन्ही काठाला करंजांची दाटी. चार रामोशांच्या पोरांना सांगितले की, दिवस मावळेतो पोतेभर करंजा घरी येत. गाळून घेतल्या की, काम झाले. रॉकेलचा दिवा लागतोय कशाला?
"तालुक्याच्या गावी सारेच विकत! शेण आणि माती या वस्तूदेखील दुर्मीळ. कामाला माणसे मिळायची नाहीत. लाकडे मणावर तोलून वखारीतून आणायची. सारेच विकत. म्हातारी आजी एकटी गावात राहायची. तिला शेतीभातीतले काय कळणार? बिचारे वडील आईला म्हणायचे, ‘‘तू जा, गावात रहा!’’
"‘‘मुलाचं शिक्षण?’’ आईपुढे ही महत्त्वाची समस्या होती. मुलाच्या शिक्षणाच्या आशेने माझी आई खेड्यापासून दूर गेली. खेडे जसजसे दूर गेले तसतसे आमच्या कुटुंबातले सुख आणि समाधानही दूर दूर जात गेले."
"बहीण लग्न होऊन गेली होती. तिला मावशीसारखाच भयंकर सासुरवास होता. दिवसातून एकदा तरी आईला तिची आठवण व्हायची. ती डोळ्यांतून पाणी काढायची. माझ्या पाठीवर आणखी तीन भावंडे झाली होती. त्यातल्या एकाच्या डोक्यात खाडूक चिघळून किडे झाले होते. एकाच्या दोन्ही पायांच्या पिंढर्या आगषेण नावाच्या चर्मरोगाने लबथबल्या होत्या.
"आईचे शरीर क्षीण झाले होते. माझ्या जन्मानंतरच्या प्रत्येक अपत्याच्या वेळी जन्माबरोबर त्याच्या आईचाही पुनर्जन्म झाला होता. ती क्षीण झाली होती. तशात अर्धशिशीचे भयंकर दुखणे तिच्या कपाळी आले होते. मला हे सारे कळत होते. मी अकराबारा वर्षांचा होतो; पण त्यावेळी देशभक्तीच्या वेडाने मला पछाडलेले होते. जेवणाची जागा एवढंच माझ्या लेखी घराचे मोल होते.
"या काळात आई वडिलांना कडकड बोलते आहे असे अभूतपूर्व दृश्य आमच्या दृष्टीस पडले. चूल थंड पडते की काय असे प्रसंग आले. दारिद्य्राची परिसीमा झाली. वडील स्थितप्रज्ञ. आई क्षीण झालेली. ... "
"पुढे शिकण्यासाठी मी औंधला गेलो.
"जाण्यापूर्वी एक घटना घडली. ती मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.
"एके दिवशी आईचे अर्धे डोके सीमेचे ठणकत होते. दुपारचे बारा वाजले होते. घरात पाण्याचा टिपूस नव्हता. वडील कचेरीतून आले. घागर घेतली. भर उन्हात ते पाणी आणायला गेले. आधीच त्यांना दम्याचा विकार. वैशाखातले ऊन, खांद्यावर ओझे.
"मी शाळेतून परतत होतो. घागरीच्या ओझ्याने वाकलेले वडील धापा टाकीत घराकडे निघाले होते. मी त्यांच्याकडची घागर घेतली. घरी आलो. ते पाणी एका मोठ्या पिंपात ओतले.
"‘‘अण्णा!’’ आईने विचारले, ‘‘तू आणलंस पाणी?’’
"‘‘आणखी आणतो.’’ एवढेच म्हणून मी निघालो. परत ओढ्यावर गेलो. घागर भरली. घरी आलो. दहापंधरा खेपा झाल्या. ते भलेमोठे पीप काठोकाठ भरले. एक मित्र आला, तोही माझ्याबरोबर खेपा करू लागला. आई उठून स्वयंपाकाला लागली होती. मला उद्देशून ती म्हणाली, ‘‘अरे, पुष्कळ झालं पाणी. आता थांब, भातपिठलं होतंय. जेवायला बसा. भूक लागली असेल!’’ मी पेटलेलो होतो, ‘‘आणखी भांडं काढ साठवणीला.’’ एवढेच बोललो आणि परत पाणी भरू लागलो. कासंड्या, पातेले, तांबे, गडू सारी होती नव्हती ती भांडी मी तुडुंब भरून टाकली.
"‘‘आता संध्येची पळी तेवढी राहिली.’’ वडील हसून म्हणाले. ... "
"वडिलांच्या एका वाक्याने मी पाण्याच्या खेपा थांबविल्या आणि भिंतीला टेकून मुसमुसत राहिलो. सर्वांबरोबर दोन घास खाल्ले खरे; पण त्या अन्नाची चव मला कळलीच नाही.
"जेवण होताच वडील कचेरीत निघून गेले. भावंडे पांगली. आई जेवलेली नव्हती. संतप्त स्वरात मी म्हणालो, ‘‘तू जेव की! का तुला भूकच लागत नाही?’’"
"ती माझ्याजवळ आली आणि अगदी मवाळ शब्दांत म्हणाली, ‘‘बाळा, आज तू पाणी भरलंस. साठवणीला भांडं उरलं नाही माझ्याकडे.’’
"‘‘त्याला मी काय करू?’’
"‘‘तेच सांगते. वडिलांनी कष्टानं आणलेली एक घागर आता पुरवठ्याला येत नाही. तू आणलंस पाणी तर कुठं साठवावं हा प्रश्न पडला. पैशांचंही असंच. त्यांचं थोडं मिळवणं पुरत नाही संसाराला. तू कमावशील तेव्हा प्रश्न पडेल की, साठवावं कुठं?’’
"आईच्या वाक्यानंतर पाचएक वर्षे गेली असतील नसतील; मी पैसे कमावू लागलो. मध्यंतरीचा काळ आईने काटला. स्वभावात कडूपण येऊ दिले नाही. नात्याची माणसे टाकली नाहीत. क्रतवैकल्ये सोडली नाहीत. नवल म्हणजे असला फाटका संसार अंगावर लेवून ही साध्वी स्त्री देशभक्तांच्या सभांना उपस्थित राहिली. गांधींच्या उपवासाबरोबर तिने उपवास केले. शिवाशिवीची परंपरा सोडून दिली.
"मी औंधला शिकत होतो तेव्हा आमचे कुटुंब किन्हईला होते. ते दिवस जरा बरे गेले; पण तिथेही एक भयंकर प्रकार घडला. आईच्या बाळंतपणासाठी सेविका म्हणून ठेवलेली एक विधवा ब्राह्मणी आईच्या आधी प्रसूत झाली. तिने ते पापाचे पोर नरडीला नख लावून ठार केले. किन्हईच्या राजवाड्याच्या खोल नाल्यात फेकून दिले.
"ते प्रकरण लपले नाही. कोर्टकचेर्या झाल्या. आईला साक्षीला जावे लागले. तिने धिटाईने साक्ष दिली. ती बाई निरपराध सुटली. एवढेच नव्हे, तर पोटासाठी हे पाप करण्याचा प्रसंग त्या विधवेवर आला म्हणून संस्थानी सरकारने तिला तहहयात एक छोटी नोकरी देऊ केली. माझ्या आईचे माहेर अगदी आडवळणी. पाऊणशे वर्षांपूर्वी अशा खेड्यात शाळा नव्हत्या. मुलांना शिक्षण मिळण्याची पंचाईत, तेथे मुलींना कोण शिकवितो? माझी आई कुठे लिहायला शिकली देव जाणे. ती लिहीत नाही; पण वाचते पुष्कळ. लिहिताना मी तिला पाहिली. पाहतो ते ती रांगोळीची अक्षरे लिहिताना. डाव्या हाताने ती छान चित्राक्षरे लिहिते :
"‘श्रीराम प्रसन्न.’"
" ... आपल्याला पुरेसे शिक्षण मिळालेले नाही याची भाग्यवती खंत माझ्या आईला वाटते. आम्हा भावंडांना शिकवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला. अतिसंतती आणि दारिद्य्र या दोन शत्रूंनी तिचे काही चालू दिले नाही. अक्का, मी, भालचंद्र, व्यंकटेश आम्ही तिची चार अपत्ये अल्पशिक्षितच राहिलो. गावच्या पाटलाची, धनगराची मुले अशा दु:स्थितीत आईने आपल्यापाशी ठेवून घेतली. त्यांच्या शिक्षणाला साहाय्य केले."
"मी मिळवता झालो आणि आमच्या घरची स्थिती हळूहळू पालटत गेली. धाकट्या भावाने खेडे धरले. शेती नव्याने समृद्धीला आणली. आईच्या त्रस्त मनाला परमसंजीवनी मिळाली. तिची प्रकृती पुन्हा धडधाकट झाली. तिला तिच्या आवडीच्या वातावरणाचा पुनर्लाभ झाला.
"आई वृत्तीने धार्मिक असली तरी नव्यातले भलेपण तिला समजले. ती पूजा करताना सोवळे नेसते; पण ओवळ्यात असताना महाराच्या मुलीने धुतलेली साडी तिला चालते. तिची क्रतवैकल्ये चालू असतात; पण अन्य कुणाला त्याचा काही त्रास नसतो."
"आईच्या वडाचा विस्तार आता केवढा वाढला आहे! माझी कविता ही आईच्या ओव्यांची दुहिता आहे, हे मी मन:पूर्वक मान्य करतो. तिच्या गंगेतली कळशी घेऊनच मी मराठी शारदेचे पदप्रक्षालन करीत असतो. चि. व्यंकटेश माडगूळकरांची वाङ्मयीन कामगिरी वादातीत आहे.
"आईला शिक्षणाची फार आवड होती. धाकटी मुले खूप शिकली. चि. अंबादास एम.ए. झाला. समाजशास्त्र विषयात त्याने डॉक्टरेट केली. माझी धाकटी बहीण सौ. लीला रायरीकर एम.ए., एम.एड. आहे.
"माझे ‘गीतरामायण’ श्री. सुधीर फडक्यांच्या तोंडून ऐकले तेव्हा आई म्हणाली, ‘‘पुत्र म्हणून तुम्ही आपलं कर्तव्य पुरं केलंत.’’
"प्रकृती बरी होती तोपर्यंत आई गावाकडेच असे. शेतीचा व्याप वाढला आहे. ती जातीने तो पाहत आहे. अडल्यानडल्यांना सुपादुरड्यांनी देत असते. आईच्या हातांना कंजूसपणा ठाऊक नाही. तिचे हात जणू आशीर्वाद व दान देण्यासाठीच उत्पन्न झाले आहेत."
" ... परवापरवापर्यंत खेड्यात असली की, ती शहरातल्या मुलांची चिंता करायची. शहरात असली की, खेड्यातल्या मुलाची चिंता करायची."
" ... फार फार झाले तर म्हणते, ‘‘कवीनं रामरायाच्याच तोंडी घातलं आहे. ‘दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा.’ ’’ आईच्या अंगी एक उपजत विद्वत्ता आहे. ते ज्ञान कुठून आणले आहे राम जाणे!""
"अशीच तक्रार करणार्या माझ्या एका भावाला आई म्हणाली, ‘‘तुला एक गोष्ट आठवते का बाळा?’’
"‘‘कुठली आई?’’
"‘‘तुझ्या लहानपणाची. एका सकाळी उन्हं अंगावर आली. तू झोपला होतास. मी तुला उठवलं. तुझ्या हाती एक वाटी दिली. हरबर्यावरची आंब होती त्या वाटीत. मी तुला म्हटलं, ‘ही गंगाकाकूकडे दे!’
"’’ माझा भाऊ हसला. त्याला तो प्रसंग समग्र आठवला. मग तो स्वत:च पुढे सांगू लागला, ‘‘मी ती वाटी घेऊन निघालो. तो भिंतीला धडकलो. वाटी पडली. सांडली आणि माझा एक दातही दुखावला.’’
"‘‘असं का रे झालं?’’
"‘‘अगं, नुकता झोपेतनं उठलो होतो. दार कुठे आहे ते लक्षातच आलं नाही!’’
"‘‘तसंच झालं आहे या पुढार्यांचं. नुकती जाग आलीय त्यांना. वाट कोणती ते नेमकं नाही लक्षात येत त्यांच्या!’’"
"सांप्रत आई पुण्यात आहे. तिला भेटण्यासाठी गावाकडची माणसे येतात. आमचा बंगला आळंदीच्या रस्त्यावर आहे. पंढरपूरइतकीच आळंदी माझ्या गावकर्यांना प्रिय. ज्ञानेश्वर माऊलीकडे जाता येता ते आवजूर्र्न माझ्या आईला भेटतात. गावकरीमग तो कुणीही असो. मराठा असो, ब्राह्मण असो, महार असो, लव्हार असोआईला ती सारी माणसं आपलीच वाटतात."
"‘पंचवटी’तल्या बागेत पाच पवित्र वृक्ष आहेतच; पण आईसाठी बेलाचे झाडही लावलेले आहे."
" ... देवघरासाठी नंदादीप तेवता ठेवणे, निरंजनातील फुलवाती तयार ठेवणे, पूजेचे साहित्य सिद्ध करणे, यातले कुठले ना कुठले काम आई करीत असे. मनात आले तर ती भाजी निवडते, ताक घुसळते, बाकी ‘देवघर’ हेच तिचे कार्यक्षेत्र."
"आईच्या श्रद्धा आमच्या घरात कुणीही दुखवीत नाही. माझी सारी भावंडे आळीपाळीने येऊन तिला भेटून जातात. व्यंकटेश शहरातच आहे. डॉक्टरकडे जायचे असेल तर ती त्याला फोन करवते. सणासुदीचे त्याला बोलावून घेते. एकदा आईच्या पलंगाशेजारच्या खुर्चीवर बैठक मारीत मी म्हणालो, ‘‘थकलो आता आई. होईनासं झालंय!’’
"‘‘होईनासं झालंय तर करू नये. वाचावं, लिहावं, स्वस्थ असावं!’’
"‘‘असं कोण बसू देईल?’’ मी विचारले.
"‘‘का? आम्ही नाही बसलो पेन्शन घेऊन!’’
"‘‘हं!’’ एवढेच मी उघड बोललो. आईसारखे म्हातारपण यायलाही भाग्य लागते. घरकामाने कितीही थकलेली पत्नी आपल्या सासूला काहीतरी धार्मिक वाङ्मय वाचून दाखविल्याशिवाय झोपत नाही. तिने सर्वांसाठी इतके केले आहे की, तिची सेवा करण्यात सर्वांना आनंद वाटतो. घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही!"
व्यक्तिचित्र नेहमीच एका वेगळ्या आवडीने वाचली जातात. आपली काही परिचित माणसं जवळुन पाहायला मिळतात,तर काही अपरिचित,त्यांच्या स्वभावातील काही वेगळेच किंवा आधी वाचलेले पैलू परत वेगळ्याने वाचता येतात. व्यक्तिचित्रांचं पुस्तक म्हणजे एखादं छोटेखानी चरित्रच असावं असं वाटत एका व्यक्तिशः चष्म्यातुन रेखाटलेलं.
निसर्गचित्र मला तुलनात्मक वाटतात कारण तिथे मानवी मन व त्याच्या अंतरंगाची उलाघाल रेखावी लागत नाही.
माणसाच्या मनाचा, याच्या स्वभावाचा एकसारखा पट त्याच्या पुऱ्या आयुष्यात मांडायचं म्हटलं तर किती वळणे /आडवळणे ओलांडुन जाताना कुण्या सिद्धहस्ताचीही दमछाक झाल्यावाचुन राहत नाही. त्यात एखादं माणुस वाचकांना पुरतं अपरिचित असेल तर त्याला जशास तसं कागदावर लिहुन काढणं हे एक अवघड काम होऊन जातं.
गदिमाच्या या संग्रहात कितीतरी ओळखीची, फक्त नाव ऐकलेली माणसं, तर काही पूर्णतया अनोळखी असामी भेटत राहतात. ती वाचताना ती जशीच्या तशी आपल्या डोळ्यांदेखत उभी राहतात व तेवढीच जवळची हि त्यांची हातोटीच म्हणावी लागेल.