पक्ष्यांच्या घरट्यांची रचना त्यांच्या कुळाप्रमाणं बदलत असते. रातवा पक्षी अजिबात घरटं बांधीत नाही. मादी जमिनीवर अंडी घालते. जमिनीवर घरटं बांधणारे दुसरे पक्षी बहुतेक बशीच्या आकाराचं घरटं तयार करतात. त्यांपैकी कुररी (टर्न) आणि जलचर पक्षी घरट्याच्या अस्तराशिवाय शंख-शिंपल्यांचे तुकडे, खडे किंवा गवतासारख्या वस्तू यांचा उपयोग करतात. ज्या पक्ष्यांची झाडावर वीण होते, असे पक्षी काटक्या, मुळ्या, गवत, शेवाळ, इत्यादी वस्तूंचा उपयोग करून घरटी बांधतात. देवकन्हई मात्र चिखलाचं घरटं बांधते. होल्याचं घरटं म्हणजे आडव्या-तिडव्या ठेवलेल्या चार काटक्या. नारंग पक्ष्याचं घरटं चेंडूसारखं गोलाकार आणि सुबक असतं. शिंपी पक्षी आपलं घरटं पानांनी शिवून तयार करतो.