डॉ. मीना प्रभु म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. जसं आनंदी स्मित त्यांच्या मुखावर सतत विलसत असतं तसं त्यांचं लेखन कागदावर फुलत असतं. सभोवतीचं जग त्या आपल्या डोळ्यांनी निरखीत असतात आणि कागदावर उमटतो गद्यातील स्वभावोक्ती अलंकार, आपल्या प्रभावी शैलीत त्यांनी सहारा वाळवंटासारखे रुक्ष प्रदेशसुद्धा ओअॅसिस बनवून टाकले आहेत. त्यांची पुस्तकं केवळ प्रवासवर्णनं नसतात तर कधी बोटाला धरून तर कधी मैत्रीचा हात खांद्यावर ठेवून त्या आपल्याला बरोबर घेऊन जातात.
सौंदर्याचा वेध घेत घेत त्यांची लेखणी चालत असते. त्या नावाप्रमाणे साक्षात शब्द-प्रभू आहेत. त्यांच्या लेखनात कुरुपतेला वाव नाही. नचातुर्यार्थ कलाकामिनीङ हा ज्ञानेश्वरांचा शब्द त्यांचं लिखाण वाचणाऱ्या रसिकांना नक्की आठवेल असे मला वाटते. निसर्गप्रेमी बालकवी ठोमरे जर आज असते तर त्यांच्या फुलराणीनं मोगऱ्याची फुलं घेऊनच मीनाताईंचे स्वागत केले असते. आजपर्यंत जवळजवळ चार हजार पानं वाचकांपुढे ठेवून त्यांनी मराठी माणसाला जगाची सुंदर ओळख करून दिली आहे. नव्हे, मराठी साहित्यात नवे दालन खोलून ते एकहाती भरघोस केले आहे. मराठीच काय इंग्रजी वा अन्य कुठल्याही भाषेत, कोणत्याही लेखकानं इतकं प्रचंड काम प्रवासवर्णन प्रकारात केल्याचे माझ्या तरी माहितीत नाही!
Meena Prabhu is an acclaimed author of Marathi travelogues. She lives in London.