अनेक वर्षांपासून माझ्या मनात आठवणींचा फेर घुमत होता नुस्ता. मला त्याला वाचा द्यायची होती. पण संसाराच्या धबडग्यात ते राहूनच जात होतं. पण गेल्या दोनतीन वर्षांपासून मनाचा नुस्ता कोंडवाडा झाला होता. असं वाटत होतं की आपलं आयुष्य आता लौकर संपणार आहे. त्या आधी मनाची ही घुसमट सगळी काढून टाकायचीय. पण गेल्या काही दिवसांपासून मनात धाकधूकही होतेय, ‘कृष्णाबाई, तू एक अडाणी बाई, तू जे काही सारं सांगते आहेस ते चांगलं झालं तर ठीक; पण नाही चांगलं झालं तर...? मग निदान ते चांगलं व्हावं अशी प्रार्थना तरी कर!’ सगळ्यांच्या आयुष्यात सगळं चांगलंच घडतं असं नाही. काही अनुभव वाईटही असतात. कदाचित यातले काही चांगले-वाईट अनुभव निसटूनही गेले असतील. पण जे आठवतंय ते तरी सांगितलंच पाहिजे.