या पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांनी लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचे हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत. एखादे लोकगीत कानांवर पडते, तर कधी एखादी लोककथा; कधी एखादी म्हण, एखादा वाक्प्रचार, तर कधी एखादी परिपूर्ण समजूत. त्या त्या क्षणी, अभिजाताचे पोषण कुठून कसे होते, ते उत्कटतेने जाणवते. अन् अभिजात मधूर्तेने भरलेली एखादी रसाळ कविता वाचताना किंवा जिवनचिंतनाची प्रगल्भता प्रकट करणारी एखादी कथा ऐकताना लोक आणि अभिजात यांच्या अनुबंधाची विविध दर्शने घडतात. उभय परंपरांचे ते नाते उलगडणे हेच या ललित लेखनाचे सूत्र बनले आहे. अतिशय संवेदनशीलतेने आणि सूक्ष्मतेने अर्थाचा अवकाश संपूर्ण समजून घेऊन केलेले हे लेखन जाणकार रसिकांना आपल्या विविधरंगी परंपरेच्या वैशिष्ट्यांची निश्चितच एक नवी जाणीव देणारे आहे.