आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून? कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो? आपली मते खरोखरच आपली असतात का? आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का? सत्य मानत असतो ते सत्यच असते का? की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे? तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात? या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते? साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात? बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात? एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते? कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात? हे सारे करणारे असते तरी कोण? अदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार! ही कहाणी आहे या सगळ्याची. अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची. आपल्याला वेढून टाकणार्या प्रोपगंडाची. त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट, परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.
प्रोपोगांडा हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडत असतो. एखादे असत्या किंवा अर्धसत्य आपल्या सोयीनुसार विरोधकांविरुद्ध जनतेसमोर यशस्वीपणे मांडणे असा याचा ढोबळ अर्थ. आजकाल हा शब्द बरेच जण वापरत असले तरी प्रोपोगांडा फार पूर्वीपासून निरनिराळ्या प्रकारे अनेक जणांकडून वापरला गेला आहे. त्याचा इतिहास, रूपे, तंत्रे, मांडणी कालानुरूप बदलत गेली एवढाच काय तो फरक. ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धात जर्मनी विरुद्ध, हिटलरने दुसऱ्या महायुद्धात ज्यूंविरुद्ध, अमेरिकेने रशिया विरुद्ध, रशियाने रशियन क्रांती आधी झार राजवटीविरुद्ध पासून आजच्या काळात ओबामा, ट्रम्प पासून भाजपने काँग्रेस विरुद्ध कसा वापरला हे उत्कृष्टपणे मांडले आहे.
प्रोपगंडा या विषयावर ३८० पानांचे विस्तृत, मुद्देसूद, अजिबात कंटाळा येणार नाही अशी वाचनीय माहिती असणारे मराठीमधील एकमेव पुस्तक. इथे जगाच्या भूतकाळातील घटनांपासून सुरुवात करीत अगदी अलीकडच्या भारताच्या वर्तमानकाळातील घटनांच्या ऊहापोहामधून propaganda विषयी माहिती दिलेली आहे. प्रत्येक सुजाण मराठी वाचकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक!