" मर्हाटा पातशाह " छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड जवळ घेऊन जाण्याची ताकत या पुस्तकात आहे.महाराज अनुभवायचे असतील तर जरुर म्हणजे जरुरच पुस्तक वाचा. शिवराय विश्वव्यापी आहेत, ते त्या काळातही विश्वव्यापी होते याची प्रचिती पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना येतीये. एकुण पाच प्रकरणांमध्ये विभागले गेलेले हे पुस्तक.प्रत्येक प्रकरणाला आतील माहितीच्या आधारे दिले गेलेले नाव त्यातील लेखांश वाचण्यास नक्कीच परावृत्त करते. आत्तापर्यंत छत्रपती शिवरायांना ऐतहासिक अभ्यासग्रंथांमध्ये कमी आणि मालिकेंमध्ये पाहिलेली महाराज प्रेमी लोकसंख्या जास्त आहे.खरे महाराज अनुभवायचे असतील तर सोप्यात सोप्या भाषेत या पुस्तकात मांडलेले महाराज सामान्यातीसामान्या वाचकाला देखील आकलनक्षम आहेत. छत्रपती शिवरायांनी समकालीन किंवा त्याच्या जवळपास असणारी १६ रंगीत चित्रे या पुस्तकात आहेत. छत्रपती शिवरायांची समकालीन चित्रे हा नक्कीच महत्वाचा विषय होता त्या शिवाय खरे महाराज आपल्यासमोर उभे राहिले नसते. वा.सी.बेंद्रे यांनी सर्वप्रथम महाराजांचे समकालीन चित्र प्रकाशित केले त्या अाधी एका मुघल अधिकार्याचे चित्र सबंध महाराष्ट्रभर महाराज म्हणुन पुजले जायचे ते चित्र मिळवण्यासाठीचा वा.सी.बेंद्रेंचा प्रयत्न आणि ज्या लेखकाच्या संग्रहातुन हे चित्र मिळाले त्याच्या संग्रहातील हे चित्र नक्की काढले कुणी आणि ते नेदरलँडसारख्या ठिकाणी कसे पोहोचले याच्यामागची रंजक कथा आपल्याला कळेल. त्याचप्रमाणे इतिहासात हरवलेल्या एका डच चित्रकाराची माहिती आपल्याला मिळते ज्याने महाराजांना पाहिले होते.त्यांचे सहकारी,दरबारी पद्धती पाहिल्या होत्या व त्या विलक्षण बुद्धीच्या माणसाचे या सर्वांची चित्रे काढली.पण दुर्दैव त्याचे नाव इतिहास विसरला होता. निकोलाव मनुची नावाचा एक व्हेनिस चा रहिवाशी मुघलांचा माणुस. शिवाजी राजांना त्याने पाहले आणि एका चित्रकाराकडुन महराजांचे चित्र काढुन घेतले.पण एका तांत्रिक चुकीमुळे ते चित्र मीर महंमद याने काढले असा समज आत्तापर्यंत प्रचलित होता.परंतु मीर महंमद हा त्या चित्राचा चित्रकार नाही तर दुसरा कोणी आहे याचे अभ्यासपुर्ण विश्लेषण लेखकांनी केले आहे. गणितासारखा इतिहासाचा नियम असतो LHS = RHS.इतर लोकांनी लिहिलेली आणि आपल्या संदर्भांमध्ये सापडलेली माहिती जर सारखीच असेल तर त्याची सत्यता अधिक असते.ज्या लोकांनी महाराजांना प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे असे अनेक परकिय प्रवासी,इंग्रज-डच-पोर्तुगीज-फ्रेंच वकीलांची पत्रे व रोजनिश्या,परकालदासांची पत्रे, कविंद्र परमानंदांचे शिवभारत , आज्ञापत्रे , सभासद बखर या सगळ्यामध्ये शिवरायांचे आलेले उल्लेख म्हणजे प्रत्यक्ष शिवरायांचा अनुभव देणारे आहेत. त्यातील योग्य प्रकरणांचा अभ्यास करुन त्यांचा या पुस्तकात समावेश असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नक्की असतील कसे,त्यांचे बोलणे कसे असेल त्यांची विचारक्षमता कशा प्रकारची असावी याचे उत्कृष्ट पद्धतीने विश्लेषण केले आहे.त्यामुळे त्या संदर्भातील प्रकरणाचे वाचन करताना साक्षात छत्रपती डोळ्यासमोर उभे राहुन आपल्याशी बोलल्याचा भास होतोय. महाराजांना जोडून छत्रपती संभाजी महाराज,छत्रपती शाहु महाराज,औरंगजेब,कुतुबशाही पंतप्रधान आक्कण्णा-मादण्णा तसेच काही मुघलकालीन प्रसंगाच्या चित्रांचा समावेश असल्याने पुस्तकाला अधिकच बहर आला आहे.काही नजिकच्या काळात काढल्या गेलेल्या चित्रांचा समावेश केला आहे तसेच मराठा चित्रशैलीच्या अतिउत्तम चित्रांचा समावेश करुन माहिती दिली आहे.