"अजातशत्रू कादंबरीला काही वर्षांनी भारतातील सर्वोत्तम साहित्यात गणलं जाईल."- प्रा. व्यंकटेश अत्रे श्वास रोखून धरायला लावणारं कथानक.. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारतात घडणारी ही सूडकथा! एक अस्सल ऐतिहासिक फँटसी. एखाद्या टिपिकल ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे ह्यात फक्त युद्धप्रसंग, अवजड शब्दांची पेरणी, दरबारातली चर्चनाट्ये नाहीत. अजातशत्रू मध्ये आहे- अतिवास्तववादी प्रसंग, खऱ्या माणसांसारखी वागणारी पात्रे, जंगलातील विकट विचित्र हल्ले, रक्त सळसळवणारा शौर्यरस, वैचित्र्यपूर्ण युद्धे, प्राचीन केमिकल व मॅकेनिकल वॉरफेअर, आणि बरंच काही.
प्रतिक्रिया-
".. गेम ऑफ थ्रोन्सच्या दर्जाचं फँटसीकल साहित्य भारतात निर्माण होतंय. अजातशत्रू ही कादंबरी जगभरात बेस्टसेलर होणार ह्यात शंका नाही." -ले. गणेश साबळे
"मराठी साहित्यात पहिल्यांदाच इतकी वास्तववादी ऐतिहासिक कादंबरी निर्माण झाली आहे.." - दिग्द. इंद्रजित भोसले
सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा भारत… आणि त्या काळात घडलेली एक क्रूर, रक्तरंजित घटना. मगध साम्राज्याचा प्रजाप्रेमी व दानशूर सम्राट बिंदुसार याची त्याच्याच पुत्राकडून निर्दयपणे झालेली हत्या. वडिलांचे रक्त सांडवून अजातशत्रू सिंहासनावर बसतो.पण या काळ्या इतिहासाची खरी सुरुवात नेमकी कशी झाली,याची ही अंगावर काटा आणणारी कहाणी आहे.
ही कथा आहे इतिहासाच्या पानांत हरवलेल्या एका राजघराण्याची......
सत्तेची कोणतीही लालसा नसलेला, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल कुणीक हळूहळू क्रूर, रक्तपिपासू अजातशत्रू कसा बनतो,हा बदल लेखकाने अत्यंत प्रभावी आणि वास्तववादी पद्धतीने वाचकांसमोर उलगडला आहे.
सुरुवातीला ही कथा कुणीकाभोवती फिरते,पण जसजसं कथानक पुढे सरकतं,तसतसं लक्षात येतं की ही केवळ एका राजाची नाही, तर कुणीकाला अजातशत्रू बनवणाऱ्या जयराज या लोहाराच्या सूडाची कहाणी आहे.
बिंबिसारच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी युवराज कुणीक जयराजचं संपूर्ण गाव भस्मसात करतो.त्या आगीत गावासोबतच जयराजचा रक्तकंठ नावाचा घोडाही मृत्युमुखी पडतो,आणि इथूनच सुरू होते जयराजच्या सूडाची धगधगती वाटचाल.
ही कादंबरी कुठेही अनावश्यकपणे लांबत नाही.कथानक वेगाने पुढे सरकत राहतं,म्हणून ती रटाळ किंवा lengthy वाटत नाही.उलट संपूर्ण कादंबरीला एका प्रभावी वेब सीरिजसारखा थरारक वेग आहे.
वरकरणी ही जरी ऐतिहासिक कादंबरी भासत असली, तरी तिच्या वाचनातून एक वेगळंच विश्व उलगडतं. इतिहासाला कल्पनेची जोड देत लेखकाने ही कादंबरी अत्यंत गुंतवून ठेवणाऱ्या शैलीत साकारली आहे.
या कथेत मानवी भावनांचे अनेक पदर उलगडत जातात. जयराज, अजातशत्रू, वाजीरा, उदयन, मेघा,कार्तवीर्य, चेलना अशी अनेक प्रभावी पात्रं लेखकाने अक्षरशः पानांवर जिवंत केली आहेत. प्रत्येक पात्र स्वतंत्रपणे उभं राहतं आणि कथेला अधिक खोल अर्थ देत जातं. वजिराचं पात्र मला वैयक्तिकरित्या प्रचंड आवडलं. वडिलांच्या अनुपस्थितीत सिंहासनाची जबाबदारी सांभाळणारी वजीरा राज्य करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती ठेवते,पण केवळ स्त्री असल्यामुळे तिला ते करता येत नाही. वाजिरा हे पात्र लेखकाने अतिशय ताकदीने उभं केलं आहे. तिला कमजोर न दाखवता, एक महत्त्वाकांक्षी, कणखर आणि धाडसी स्त्री म्हणून वाचकांन समोर मांडल आहे. मात्र अशी सक्षम स्त्रीही पुत्रप्रेमापोटी हतबल होते. वाजिराचा दुर्दैवी अंत वाचकाच्या मनाला चटका लावुन जातो,आणि तिथेच कथा एक अनपेक्षीत वळन घेते.
कथेतील काही प्रसंग इतके तीव्र आहेत की ते वाचकाच्या मनाला हादरवून सोडतात.
ही कादंबरी केवळ एका राजाच्या क्रौर्याची नाही तर सत्ता, सूड आणि अपमान माणसाला कसं बदलून टाकतात याची कथा आहे.
इतिहास वेगळ्या दृष्टिकोनातून मांडणारी,मनाला अस्वस्थ करणारी आणि विचार करायला लावणारी ही कादंबरी ऐतिहासिक साहित्यप्रेमींनी नक्की वाचावी अशी आहे.