विनायक सदाशिव वाळिंबे, अर्थात वि.स. वाळिंबे किंवा बाबा वाळिंबे (ऑगस्ट ११, इ.स. १९२८ - २२ फेब्रुवारी, इ.स. २०००) हे मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. तसेच केसरी वृत्तपत्राचे ते पत्रकार होते.
विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ऑगस्ट ११, इ.स. १९२८ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव होते. त्यांना राजा, मनोहर असे दोघे भाऊ व द्वारका नावाची एक बहीण होती.
विद्यार्थिदशेत वाळिंबे पुण्यात वास्तव्यास होते. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते. या घडामोडींमध्ये त्यांचे शिक्षण खंडले. लवकरच ते प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले. प्रभात वृत्तपत्रानंतर ते ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रात काही काळ नोकरीस होते.
इ.स. १९६२-६३च्या सुमारास वाळिंबे केसरी वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते.
इतिहास आणि तो घडवण्यात अग्रेसर असणारी मोठी माणसे यांचे जबरदस्त आकर्षण वि.स.वाळिंबे यांना होते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. पण त्यांचे या विषयांवरचे लेखन कधी इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याच्या भरात क्लिष्ठ, कोरडे आणि कर्कश झाले नाही, की इतिहासाला जिवंत, थरारक करण्याच्या नादात भावविवश किंवा भावगौरवात्मकही झाले नाही.
वाचनीयता आणि रसवत्ता जराही उणावू न देता अभ्यास आणि कष्ट यांनी निवडून, पारखून दिलेला तपशील उत्तम रीतीने मांडण्याचे कौशल्य वाळिंबे यांच्या जवळ होते. त्यांच्या लेखणीला ती एक सिध्दीच होती.
प्रसंगातले नाट्य अचूक टिपण्याच्या त्यांच्या मार्मिकतेमुळे वाचकाला अपूर्व समाधान मिळते. त्यांचा हिटलर किंवा त्यांचे सावरकर किंवा त्यांचे नेताजी वाचताना त्यातले प्रसंगनाट्य अक्षरश: खिळवून ठेवते; पण त्यांच्या लेखणीचे बळ केवळ तेवढेच नाही.
घटना - प्रसंगांचे अंत:प्रवाह शोधणार्या त्यांच्या बारकाव्यात ते आहे, मोठ्या पार्श्वपटावर लहान घटना पाहण्याच्या जाणकारीत आहे, संदर्भांची विविधता आणि त्यातून घटना-प्रसंगांना मिळत जाणारी दिशा यांकडे लक्ष पुरवण्याच्या त्यांच्या दक्षतेत आहे आणि व्यक्तीच्या मर्मस्थानांविषयी अतिशय कुतूहल बाळगणार्या त्यांच्या प्रगल्भ जीवनदृष्टीत आहे.
त्यांनी मोठ्या माणसांच्या मोठेपणाची अनेक अंगांनी उकल करण्याचा प्रयत्न केला. मानवी मर्यादांचे, दौर्बल्याचे, मोहप्रवणतेचे भान ठेवून त्यांनी जागतिक पातळीवरची महत्वाची व्यक्तिमत्त्वे लेखनविषय केली. चांगल्या जाणत्या, तयारीच्या बहुश्रुत अशा वाचकाचेही समाधान करणारी गुणवत्ता त्यांच्या लेखनात प्रकट झाली आणि ती शेवटपर्यंत अखंड टिकूनही राहिली.