आपल्या शरीरातील रक्त हा सर्वात महत्त्वाचा घटक. पण या रक्ताचे घटक कोणते, प्रकार किती या व अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे अभ्यासपूर्ण पुस्तक नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी लिहिले आहे. सर्वसामान्य वाचकांना कळेल अशा सोप्या भाषेत त्यांनी जीवनावश्यक घटकाची माहिती पुस्तकरूपाने वाचकांना दिली आहे.
जर एखाद्याला रहस्यकथा किंवा सस्पेन्स थ्रिल्लर वाचायला किंवा बघायला आवडत असेल तर हे पुस्तक त्याला नक्कीच आवडेल! या पुस्तकातली रक्ताची गोष्ट रक्ताच्या गूढापासून जी सुरू होते ती त्यातलं विज्ञान, त्याचा ‘रक्तरंजित’ इतिहास, त्यातले शोध, त्यातले भन्नाट आणि विक्षिप्त शास्त्रज्ञ, ती स्पर्धा, ती नोबेल पारितोषिकं, त्यातली गुन्हेगारी, दलाली, ठगगिरी आणि तसंच सचोटीपणा, प्रामाणिकपणा, जिद्द, शौर्य, माणुसकी अशा अनेक खाचखळग्यातून उमलत जाते. इथे आपल्याला रक्ताचे घटक, त्यांचं कार्य, रक्ताभिसरण, रक्ताचे रक्तगट, त्याची साठवण आणि ब्लड बँक्स यातलं अतिशय रंजक विज्ञान आणि त्याचा इतिहास तर वाचायला मिळेलच, पण त्याशिवाय त्याविषयीच्या अनेक गोष्टी उलगडत जातील. ब्लड ट्रान्स्फयूजन म्हणजेच रक्ताच्या देवाणघेवाणीचा इतिहास आपण यात अनुभवू, तर पूर्वीच्या काळी अनेक रोगांवर उपाय म्हणून माणसाचं रक्त चक्क भळाभळा वाहू देणं या ‘ब्लड लेटिंग’ च्या पद्धतीचा भीषण इतिहास आपल्या अंगावर काटे आणेल. ब्लड ट्रान्स्फयूजन आणि ब्लड बँक्स यांचा इतिहास आणि त्यामागच्या विज्ञानाबरोबरच रक्ताचा बाजार कसा उभा राहिला आणि फोफावला याचा इतिहासही आपल्याला चकित करून सोडेल. दोन्ही महायुद्धात रक्तपेढ्या, रक्तदान आणि ट्रान्स्फ्य्ाूजन यांचा काय रोल होता हेही आपल्याला समजेल. यानंतर रक्ताचा व्यापार, त्याचं जागतिकीकरण आणि एड्स, हिमोफिलिया आणि हिपॅटायटिस असे रक्तविकार याविषयी हे पुस्तक आपल्याला सखोल ज्ञान पुरवेल.