'वर्तुळ' हा माझा पहिला कथासंग्रह. हा प्रकाशित होतानाचा आनंद, खरं तर अत्यानंद, मी शब्दांत मांडू शकणार नाही, कारण तो अवर्णनीय आहे. आपल्या पहिल्या वहिल्या यशाचं आपल्याला खूप अप्रूप असतं, तसं ते मलाही आहे. मी लिहू शकेन असं कधी मला वाटलंच नव्हतं. शाळेत असताना मला निबंध लिहायला खूप आवडायचं. पुढे महाविद्यालयात असताना वाचायची प्रचंड आवड असल्याने अनेक चांगल्या लेखकांची पुस्तकं मी वाचत गेले. वाचून झालं की त्यावर विचार करायची मला सवय लागली. हे सगळं मनात कुठेतरी झिरपत गेलं असं मला वाटतं. आत्ता पाच वर्षांपूर्वी नवरात्रात सहज म्हणून लिहायला लागले. माझ्या आईबद्दल लिहिलेल्या माझ्या पहिल्या लेखाला इतका भरभरुन प्रतिसाद मिळाला की त्यामुळे स्फूर्ती मिळून मी त्यानंतर सतत लिहीत गेले.