मखमली मदालसा--- माणसाची वाट कोणती नियती पाहत असते हे आजवर कुणालाही कळालं नाही. माणसाच्या जीवनात अनेक वळणं येतात. वळणाच्या अलिकडे माणूस आणि पलिकडे असते त्याची अज्ञात नियती. नियती कधी स्वागत करते, कधी असा तडाखा देते की होत्याचं नव्हतं होऊन जातं. आयुष्य पार उध्वस्त करून टाकते. अनुराधाच्या जीवनातही असंच एक वळण आलं. वडिलांच्या इच्छे विरूद्ध, अभिरामशी विवाह करण्यासाठी ती घर सोडून घटांबरीला आली. घटांबरीला भेटल्यावर दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वरला जाऊन मंदिरात लग्न करण्याची त्यांची योजना होती. अनुराधा घटांबरीला पोहचली. परंतु अभिरामचा पत्ता नव्हता. खरं तर तो तिच्या आधी तिथं पोहचायला हवा होता. वारंवार फोनकरूनही, त्याने अनुराधाचा फोन उचलला नाही.