सेतुमाधवराव पगडी यांनी आपल्या ‘हिंदवी स्वराज्य आणि मोगल’ या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी गौरवोद्गार काढले आहेत. ते म्हणतात, “...संभाजीराजांचा असा शेवट झाला. त्यांच्या आत्मबलिदानामुळे त्या अद्भुत आणि रोमांचकारी आयुष्याचा कळस झाला. संभाजीराजांचे सर्वांत मोठे गुण म्हणजे साहस आणि निर्धार हे होत. ...मोगलांशी निकराच्या झुंजी देऊन त्यांनी त्यांची आक्रमणे परतवून लावली; स्वराज्यातील कारस्थाने त्यांनी हाणून पाडली; फितूर लोकांना त्यांनी कडक शिक्षा केल्या; त्यांनी बंडे मोडून काढली; पोर्तुगीजांना तंबी दिली; विजापूर आणि गोवळकोंडा या राज्यांना यथाशक्ती मदत केली; आणि हे सगळे त्यांनी नऊ वर्षांच्या अल्पावधीत करून दाखविले… शेवटी ते मोगलांच्या कैदेत सापडले.