अमेरिकेच्या मॅक्डोनाल्ड मध्ये गेल्यावर एक साधा विचारला जाणारा प्रश्न 'फॉर हियर ऑर टू गो? म्हणजे इथेच थांबून आस्वाद घेणार की पार्सल घेऊन तिकडे जाणार? हाच धागा पकडून अपर्णा वेलणकर यांनी भारतातून जाउन अमेरिकेत सेटल झालेल्या अनेक मराठी मनाची कथा आणि व्यथा अतिशय सुंदर शब्दात मांडली आहे त्यातील प्रत्येकालाच पडणारा हा सोपा प्रश्न 'फॉर हियर ऑर टू गो?' इथेच रहायचंय की भारतात परत जायचंय?
अपर्णा ताई यांनी अमेरिकेत भरपूर प्रवास करून, तिथल्या मराठी कुटुंबा सोबत तासनतास चर्चा विनिमय करून, त्यांच्या अंतरंगात डोकावून खूप अभ्यासपूर्ण पद्धतिने हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक वाचताना नकळत आपण अमेरिकेत कधी जाऊन पोहोचतो समजतच नाही आणि आपल्या तिकडच्या बांधवांबद्दल कधीही केला नाही असा पॉज़िटिव विचार नक्कीच मनाला स्पर्शून जातो. एरवी अमेरिकेत जाणारा माणूस म्हणजे आपल्या देशात शिकून त्या देशाकारिता राबणारा, आपल्या देशाचे ऋण न फेडणारा, भारतातील बुद्धिमत्तेचे ब्रेन ड्रेन अशी सर्व साधारण प्रतिमा अनेकांच्या मना मध्ये असते परंतु या सर्व गोष्टींना छेद देणारे आणि एक वेगळाच व्यापक दृष्टिकोन देणारे हे पुस्तक म्हणजे खूप खूप छान प्रयत्न आहे असे मला वाटते.
१९६० च्या काळात अमेरिकन इमिग्रेशन अॅक्ट मधे बदल झाल्या नंतर अमेरिकेची दारं भारतीयांना उघडली गेली आणि साचेबद्ध मिडल क्लास मानसिकतेतून मराठी माणूस साता समुद्रापार जाउन नव्या देशात नव्या आयुष्याची सुरूवात करू लागला. त्याच्या या संपूर्ण थरारक प्रवासात त्याला अनंत अडचणी आल्या,अडचणींचे डोंगर उभे राहीले, अनेक संकटांना सामोरे जावे लागले पण एकदा इकडे आलोच आहे तर आता माघार नाही ही अपार जिद्द घेऊन मराठी माणूस संघर्षाला तोंड द्यायला तयार झाला.आपल्या देशा बद्दलची आपल्या माणसंबद्दल ची प्रचंड ओढ, परक्या देशात राहून स्वतःला सिद्ध करण्याची प्रचंड धडपड त्या करिता केलेले अपार कष्ट, दिलेली झुंज़ त्यातूनच मिळालेले अपरंपार वैभव आणि यश-अपयश या सर्वांचा लेखाजोखा अगदी कुठलाही एकांगी निष्कर्ष न काढता अपर्णा ताई यानी वाचकांपुढे मांडला आहे. सदर पुस्तक कुठल्याही व्यक्ती बद्दल नसून संपूर्ण समूहाचा व्यापक अभ्यास, व्यापक दृष्टिकोन लेखकांने मांडला आहे.
अमेरिकेबद्दल इथल्या लेखकांनी बरीच पुस्तके लिहिली परंतु त्यात अमेरिके बद्दल आणि तिथे राहणार्या मराठी समुहा बद्दल एकांगी आणि नकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो, अमेरिका म्हणजे मुक्त विचारांचा ,अधोगतीच्या चिखलात रुतत चाललेला एक देश अशीच प्रतिमा रंगवली गेली. तसेच अमेरिकेत आपले बांधव गेले म्हणजे फक्त डॉलर्स कमवायाला गेलेले, स्वदेशा बद्दल घेणेदेणे नसलेले, देशद्रोही असा एकांगी दृष्टिकोन ठेवला गेला. त्यांच्या अंतरंगात, त्यांच्या भावविश्वात डोकावून त्यांच्या आशा निराशेचे क्षण स्पर्शून पहावे आणि त्यांचा आपल्या माती कडे पाहण्याचा दृष्टिकोन तपासून असे मराठी लेखकांना का वाटले नाही याचे आश्चर्य वाटते.
पूर्व आणि पश्चिमे कडील मूळ विचारसरणीत असलेला फरक म्हणजे 'उद्या'चा विचार करून 'आज' संयम बाळगण्याचा पुरस्कार करणारी आपली 'पूर्व'....आणि 'आज'प्रत्येक क्षण आजच जगण्यचा,उपभोगण्याचा मूलभूत स्वभाव असलेली 'पश्चिम' यातूनच तिकडे गेलेल्यांना आपली नवीन पिढी वाढवताना अनेक संघर्षना तोंड द्यावे लागले. तिकडे जन्मलेल्या पिढीला बाहेर पडले की 'अमेरिकन कल्चर' आणि घरी असले की 'भारतीय संस्कृती' अशा अनोख्या मानसिक संघर्षातून नेहमीच जावे लागले परंतु त्यातूनही दोन्ही देशांचा,दोन्ही संस्कृतींचा आदर एकाच वेळी बाळगून दोन्हीचा समतोल साधताना ही नवीन पिढी दिसते.बेस्ट फ्रॉम बोथ वर्ल्ड्स घेऊन पूर्व आणि पश्चिमेच्या दोन टोकांमध्ये काहीतरी सुंदर, शाश्वत शोधण्याचा प्रयत्न ही पिढी करते आहे,या नवीन पिढीत देखील यशस्वी झालेली अनेक उदाहरणे पहायला मिळतात.
1960 च्या काळाचा आणि आत्ताचा विचार करता खूप बदल झाले आहेत, सर्व काही खूप फास्ट झाले आहे. अमेरिकेला जाणे येणे तितकेसे अवघड राहिलेले नाही, इकडच्या सर्वच गोष्टी तिकडे मिळायला लागल्या आहेत, technology ने सर्व काही खूपच advance झाले आहे परंतु मूळ प्रश्न अजूनही तसाच आहे.... फॉर हिअर ऑर टू गो?
'अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांचे आयुष्य उलगडून दाखवणारं पुस्तक" अशा आकर्षक टॅगलाईन मुळे पटकन वाचायला घेतलेलं पुस्तक बऱ्याच अंशी निराशा करून जातं. परदेशात, विशेषतः अमेरिकेत स्थायिक झालेली मराठी माणसं कोणत्या परीस्थितीत तिथे गेली, त्यांचे अनुभव, त्यांची मनस्थिती, मानसिकता या सगळ्याचा आढावा घेत वाचकाला नाण्याचा दोन्ही बाजूंच दर्शन करून देण्याचा हा प्रयत्न मुळात ही माणसं अमेरिकेत का गेली या मूळ प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत नाही. अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनेक मराठी लोकांच्या मुलाखतीतून पुस्तक आपल्यापुढे साकारत जातं पण या मुलाखती फार वरवरच्या राहिल्या आहेत असं काहीसं वाटतं . अनेक लोकांनी घेतलेले अशक्य असे कष्ट, भोगलेल्या साऱ्या बर्या वाईट प्रसंगातून ह्या लोकांचा धैर्याला सलाम करावासा नक्की वाटतो. पण पुन्हा बऱ्याच प्रमाणात "आम्हाला भारतात संधी नव्हत्या म्हणून आम्ही अमेरिकेत आलो" हेच उत्तर मिळत राहतं आणि मग आपली बाजू मांडण्यासाठी आपण कसे या देशात आलो आणि किती विचित्र परिस्थितीतसुद्धा तग राहिलो हेच अनेक ठिकाणी पुनः पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळेच काहीश्या प्रचारकी थाटाचं हे पुस्तक हा अमेरिकन मराठी लोकांनी स्वतःच कॉन्शस साफ करण्याचा केलेला हा एक स्पॉन्सर्ड प्रयत्न आहे असं वाटत राहतं.
परदेशात स्थायिक म्हटलं कि बहुतेक वेळा मनात दोनच विचार येतात. परदेशात स्थायिक म्हणजे बक्कळ पैसा, ऐशो-आराम किंवा देशद्रोही. स्वार्थासाठी स्वतःचा देश सोडून पळून जाणारे. पण परदेशात, विशेषतः अमेरिकेत स्थायिक झालेली मराठी माणसं कोणत्या परीस्थित्तीत तिथे गेली, त्यांचे अनुभव, त्यांची मनस्थिती, मानसिकता या सगळ्याचा आढावा घेत वाचकाला नाण्याचा दोन्ही बाजूंच दर्शन घडवणारा प्रवास म्हणजे 'फॉर हियर ऑर टू गो'.