महाभारताची शोकान्तिका ही तशी आपल्या परिचयाची.पराशराकडून झालेल्या वंचनेचा परिणाम म्हणून तमाम पुरुषजातीचा सूड उगवण्यासाठी, स्वत:च्या मुलास राज्यपद मिळावे या मागणीतून, प्रेमांध शंतनूराजाशी विवाहास सत्यवती तयार होते. आपले युवराजपद सोडून शंतनुपुत्र देवव्रत ब्रह्मचर्याची भीष्म प्रतिज्ञा घेतो.आपल्या पुत्रांच्या मृत्यूनंतर कुरुवंशाच्या वारसासाठी सत्यवतीला पुन्हा भीष्माकडे याचना करावी लागते. परंतु मोडेन पण वाकणार नाही हे भीष्माचे ब्रीद आहे. यातूनच घडते महाभारताची अटळ शोकान्तिका. या सर्व व्यथेचे मनोज्ञ दर्शन म्हणजे वसन्त कानेटकरांचे मत्स्यगंधा.मत्स्यगंधा नाटकाचे मराठी संगीत रंगभूमीला नवे सामर्थ्य देण्यात फार मोठा वाटा आहे.