"किमयागार" मध्ये आपल्याला भेटतात मूलभूत शास्त्र शाखा (पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र) व त्यांच्या उपशाखांमधे काम करणारे ८००हून अधिक प्रतीभावान शास्त्रज्ञ. आर्यभट्ट, अरिस्टोटल, वराहमिहीरापासून ते स्टीफन हॊकींग, जयंत नारळीकरांपर्यंत. काही विक्षिप्त, काही हेकेखोर, काही मत्सरी, काही संधीसाधू, काही दुर्दैवी... परंतु, सर्वच जण विलक्षण प्रतीभावंत. पण हे पुस्तक म्हणजे नुसतीच शास्त्रज्ञांची निरस जीवनचरीत्रें नव्हे, तर त्यांच्या माध्यमातून लेखक आपल्याला या विश्वाचा इतिहास, रचना व मानवी जीवनाची सुरूवात ऊलगडत नेतात.
पुस्तकाच्या शेवटी असणारी संदर्भग्रंथांच्या यादीवरून नुसती नजर टाकली तरी लेखनासाठी घेतलेल्या परीश्रमांची आपल्याला जाणीव होते.
प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे या पुस्तकावर बिल ब्रायसन याच्या A Short History of Nearly Everything या उत्कृष्ट पुस्तकाचा थोडाफार प्रभाव दिसून येतो, परंतु, दोन्ही पुस्तकांचा मूळ गाभा एकच असला तरी सादरीकरणाची पध्दत मात्र भिन्न आहे.
"किमयागार"ची काही वैशिष्ट्ये म्हणजे संपूर्ण पुस्तक निव्वळ मराठी भाषेत असून प्रत्येक पानावर शास्त्रज्ञांची दुर्मिळ छायाचित्रे आहेत. जोडीला सुबक, नेटकी छपाई व शेकडो छायाचित्रें यामुळे पुस्तकाचे स्वरूप अधिकच सुंदर झाले आहे. पुस्तकाच्या शेवटी असणारा "नाही रे उजाडत" हा लेख प्रत्येकालाच अंतर्मुख करेल.
आजकाल ४००/- रूपयांत एखादा pizza जेमतेम येतो. त्याच किंमतीत ज्ञान-विज्ञानाची कवाडें सताड ऊघडी करणारे आणि प्रत्येकाच्याच घरात आवर्जून असावे असे हे पुस्तक आहे.