मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
This topic is about
Thorli Paati
पुस्तक-परीक्षण | Book Review
>
थोरली पाती-एक रसग्रहण
date
newest »
newest »


‘माणुस अखेर माणुस आहे’ मधला रडणारा वड कायम लक्षात राहिल,देवधर्मापायी नवऱ्यानं सोडलेली यमना व अनाहुत वारकऱी एका मोहाच्या क्षणाला बळी पडतात,दोन्ही आयुष्य उद्ध्वस्त करणारा तो प्रसंग वडाच्या साक्षीनं घडतो.विरक्ती व सतीत्व विटाळले म्हणून वड रडतो आहे. ‘चोळी’मधे गावरान सौंदर्यावर अनुरक्त झालेलं इंग्रजी प्रेम हळुवार फुलवत नेलं आहे. दोघंही एकमेकांत गुंतून जातात. मनाला चटका लावणाऱ्या शेवटात प्रेमाग्रहाखातर स्वत:ला चोळीही न शिवणारी रामव्वा त्याचा देशाबाहेर तबादला झाल्यावर पुरती कोलमडून जाते.
सरकार दरबारी असलेल्या एका स्वाभिमानी हत्तीची कथा ‘मोती’मधुन पुढ्यात येते व नकळत डोळ्याच्या कडा ओलावते. ‘वीज’मधली तुक्याची अगतिकता काळजाला भिडते.’औंधाचा राजा’चे दिलखुलास व्यक्तिमत्व व त्यांचा दिलदारपणाच्या आठवणी वाचताना लेखकासोबत आपणही भावुक होतो.’काशीयात्रा’मधील आपल्या संन्यस्त मुलाचं दिगंबरचं व प्रयागाचं छुपं प्रेम पाहून राधाबाईंसारखा आपल्यालाही धक्का बसतो.
नागुदेव या एका वेगळ्याच पात्राशी आपली ओळख होते.तो निपुत्रिक भिक्षुक इतरांसारखा लबाड, स्वार्थी नाही.आपलं आचरण,देव,धर्म, कर्मकांडावरची त्याचा आवर्जून विश्वास तो शेवटपर्यंत सोडत नाही.सभोवती ढासळत जाणारी समाजमुल्यं तो पाहतो, अनुभवतो. पण एकाक्षणी ते स्वीकारण्याची त्याची क्षमता संपते. पहिल्या वाचनात यातलं मर्म माझ्या लक्षात आलं नव्हतं. भाव्यांनी आपल्या प्रस्तावनेत “नागुदेव”वर बरंच लिहलं, तेव्हा तो मला उलगडला.
‘तुपाचा नंदादीप’मधला खोट्या प्रेमाला फशी पडलेला सरळमार्गी सदु आजकाल फारसा नवीन राहिलेला नाही.’सिनेमातला माणुस’मधला अंध:पतित मोहन वाचुन तो स्वतःच्या बेगडी स्वभावाला बळी पडलेला आहे की परिस्थितीनं मुर्दाड बनला आहे ते कळत नाही. किशी-गोपीनाथची ‘मुकी कहाणी’आपल्याला मूक करुन जाते, हेलावुन टाकते. शेवटची ‘दिवा लावा कुणीतरी’ ही कथा म्हणजे या सर्व कथांचा परमोच्च बिंदू असल्यासारखी वाटते.याशिवाय नेमा, अतर्क्य, वेडा पारिजात, अधांतरी अशा अनेक कथा परिस्थितीपुढे हतबल झालेले कथानायकांच्या आहेत. रामा बालिष्टर हे एक वेगळ्याच धाटणीचं पात्र आहे. इतर कथापात्रांहून जरा निराळं.
गदिमांच्या कथेतुन कितीतरी माणसं भेटतात, काही लक्षात राहतात त्यांच्या स्वभावामुळे, काही कथाविषयामुळे. एका अनुभवी लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं हे कथाविश्व वाचकाच्या मनाचा ताबा घेतल्याशिवाय राहत नाही. एक संग्रही असावं असं पुस्तक अन् एकाहून एक सरस कथा तुम्हाला नक्कीच वाचायला आवडतील याची मला खात्री आहे. (less)