मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
This topic is about
युगांत
पुस्तक-परीक्षण | Book Review
>
युगांत- एक परीक्षण
date
newest »
newest »




पुस्तकाची सुरुवात भीष्म पितामह या एका महत्वाच्या व्यक्तिरेखेने होते. आतापर्यंत पितामह म्हणजे अपार मनःशक्तीचं व दैवी व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसमोर आहे, पण पात्रता व अधिकार असुनही त्यांनी त्याचा पुरेपुर उपयोग न केल्याचे काही घटनांवरून स्पष्ट होते. प्रतिज्ञा घेऊन त्यांनी नक्की काय साधले? हा हि एक विचार करण्याजोगा प्रश्न बाई शेवटी मांडतात.
गांधारी तशी थोडी दुर्लक्षित व्यक्तिरेखा आहे, पती अंध म्हणुन स्वतःच्याही डोळसपण झाकुन घेणारी एक मानिनी एवढ्यावरती तिची ओळख माहित आपल्याला माहित आहे. पण त्याहीपलीकडे जाऊन स्वपुत्रांच्या ऱ्हासाला बघणारी अगतिक माता आहे, स्वतःच्या भावाची कुटनिती कळुनही त्याला रोखु न शकणारी एक बहीण आहे. धृतराष्ट्राला त्याच्या कृष्णकृत्यात, पांडवविरोधी विचारात हिरिरीनं मोडता घालुन त्याला अडवु न शकणारी एक अबला पत्नी आहे. स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी न बांधती तर कदाचित स्वतःच्या मुलांना व भावाला ती अडवुं शकती काय?
कुंती हि त्यामानाने थोडी कणखर व सकारात्मक वाटते. पती निधनानंतर पांडुपुत्रांना वाढवणारी, माद्रेयाना विनाद्वेष सांभाळणारी एक सशक्त स्त्री वाटते, तरीसुद्धा माणसाच्या वाट्याला येणारे दुःख व वेदना तिला सुटले नाहीत. पांडवांना हस्तिनापुरात दिली जाणारी वागणुक, वनवास, लाक्षागृह प्रसंग या सर्वांना तिनं धैर्यानं तोंड दिलं आहे. तरीही लहान कर्ण बाबत तिने घेतलेला निर्णय, माद्रीचा तिच्या अंतिम क्षणी केलेला जळफळाट अशा काही मोजक्या प्रसंगात एक वेगळीच कुंती दिसते.
द्रौपदी वरचा लेख मला खास महत्वाचा वाटतो. तिच्या स्त्री व्यक्तिरेखेची सीतेबरोबर केलेली तुलना तिला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. युद्धानंतर पांडव स्वर्गारोहिणी साठी निघतात तेव्हा सर्वात पहिली द्रौपदी पडते, तेव्हा त्याचं कारण भीमाला सांगताना धर्म तिची काहीशी हेटाळणी करतो. ग्लानीत असलेली द्रौपदी त्यावर स्वतःशीच व्यक्त होते तो भाग निव्वळ अप्रतिम, शेवटी जेव्हा ती भीमाला उद्देशुन म्हणते, पुढील जन्मी पाच भावातला थोरला हो, ते हि मनाला चटका लावुन जाते. द्रौपदी नसती तरी महाभारत झालेच असते व त्याची कारणमीमांसा पद्धतशीर मांडली आहे.
पुढे सर्व पुरुष व्यक्तिरेखा समजुन घेताना प्रत्येकाचे काही वेगळे पैलु प्रकर्षाने जाणवतात-
शांत, विवेकी विदुर व सर्वगुणसंपन्न असूनही फक्त समाजव्यवस्थेला बळी पडलेला विदुर , त्याची धर्म/युधिष्ठिराशी असलेली जवळीक ते त्या दोघातील साम्य आणि तो युधिष्ठिराचा पिता असल्याचा संशय सार काही चकित करणारं आहे. युधिष्ठिराचा फुकाचा मोठेपणा, कर्णाचं अवास्तव वागणं, आयुष्यभर मी कोण? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यातील फोलपणा, त्यावेळची समाजाची घडी, लोकमान्यता या साऱ्याचा उहापोह लेखिकेने उत्तम पद्धतीने घेतला आहे.द्रोण/अश्वत्थामा एक आटोपशीर प्रकरण वाटते.
कृष्ण वासुदेव प्रकरणात सुरुवातीला खांडव वन जाळण्याचं प्रकरण, कृष्णाचा 'वसुदेव' पदवी मिळायचा आटापिटा, शिशुपाल/जरासंध बाबतचा खुलासा, अर्जुनासोबत गाढ मैत्री व प्रेम, स्वकुळाला नाशापासुन वाचवण्याचा केलेला आटापिटा, सगळंच वेगळ्या पद्धतीने समोर येतं, इतर पुस्तकात/गोष्टीत, देवपणाखाली दबलेला कृष्ण एका मानवी प्रतिमेत दिसतो.
एकुणांत काय तर महाभारतातील काही निवडक पात्रे व त्यांच्या आतापर्यंत ऐकलेल्या/वाचलेल्या कथा यामुळे झालेल्या काही समजुतींना खऱ्या इतिहासाच्या अंगाने समजुन घेताना तडा जातो. युगांत वाचताना महाभारताच्या पार्श्वभुमीवर त्यावेळच्या समाजमूल्यांच्या अनुषंगाने वागलेल्या व्यक्तिरेखा तुमच्या-आमच्या सारख्याच वाटतात. विचार एकच उरतो, मानवी जीवन कितीही उंचीवर घेऊन गेलेलं असलं तरी वैफ़ल्यग्रस्तच आहे.