शूटिंग

पानवलकरांच्या 'शूटिंग' या पुस्तकावरील 'ब्लर्ब', (सुरुवातीला काही संदर्भ स्पष्ट होण्यासाठी)-


‘अर्धसत्य’ या गाजलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाची ही दैनंदिनी आहे. या चित्रपटाची ‘सूर्य’ ही मूळ कथा लिहिणारे श्री. दा. पानवलकर यांनीच या सर्व चित्रीकरणाला चिकाटीने उपस्थित राहून ही दैनंदिनी लिहिली असल्यामुळे तिच्यात आत्मीयता आली आहेच, पण पानवलकरांच्या चित्रदर्शी लेखणीची धार आणि तळपही या पुस्तकाला लाभली आहे. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरणी अथपासून इतीपर्यंत तपशीलवार नोंदणारे असे पुस्तक मराठीत तर नाहीच, पण इतर अनेक भारतीय भाषांमध्येही प्रकाशित झालेले नसेल. चित्रपटकलेशी संबंधित असणारे कलावंत व तंत्रज्ञ यांच्यापासून तो चित्रपट व साहित्य या दोहोंच्या रसिकांपर्यंत सगळ्यांनाच हे पुस्तक वेधक वाटेल. (भरपूर छायाचित्रांमुळे या ‘दृश्य’प्रधान चित्रपट-माध्यमावरील पुस्तकाची प्रत्ययकारिता वाढली आहे.)

श्रीकृष्ण दामोदर पानवलकरांनी कधीकाळी एकांकिका, नाटक, ललित लेखही लिहिले असले तरी मराठी रसिक त्यांना ओळखतात ते कथालेखक म्हणून. १३ फेब्रुवारी १९२८ रोजी सांगली येथे जन्मलेल्या पानवलकरांनी जन्मगावीच माध्यमिक शिक्षण पुरे करून मुंबईत तीस वर्षे कस्टम्स खात्यात अधिकारी म्हणून नोकरी बजावली. या काळात ‘गजगा’ (१९६३), ‘औदुंबर’ (१९६३), ‘सूर्य’ (१९६८), ‘एका नृत्याचा जन्म’ (१९७५), ‘चिनाब’ (१९७८) हे कथासंग्रह आणि ‘जांभूळ’ (१९८१) हा दीर्घकथासंग्रह अशी त्यांची सहा पुस्तके प्रकाशित झाली. त्यांपैकी ‘औदुंबर’, ‘सूर्य’ व ‘चिनाब’ यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला, ‘सूर्य’ या कथेला ‘अभिरुची’ कथास्पर्धेत पारितोषिक मिळाले, आणि ‘अर्धसत्य’च्या मूळ कथेचे लेखक म्हणून त्यांना १९८४चे फिल्मफेअर पारितोषिकही मिळाले. प्रस्तुत पुस्तक प्रसिद्ध होण्यापूर्वी, दि. १९ ऑगस्ट १९८५ रोजी सांगली या आपल्या जन्मगावीच श्री. दा. पानवलकर दिवंगत झाले. 
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 22, 2011 21:28
No comments have been added yet.


Shri Da Panvalkar's Blog

Shri Da Panvalkar
Shri Da Panvalkar isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.
Follow Shri Da Panvalkar's blog with rss.